Bhosari: जिजामाता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केली यशोगाथा स्वातंत्र्यसंग्रामाची!

एमपीसी न्यूज – भोसरी येथील सेवागिरी शिक्षण संस्थेच्या जिजामाता प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अंकुशराव लांडगे सभागृहात उत्साहात पार पडला. ‘1857 ते 1947 – यशोगाथा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची’ ही या गुणदर्शन कार्यक्रमाची प्रमुख संकल्पना होती.

बालवर्गापासून दहावीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. भारताचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चापेकर बंधू, चंद्रशेखर आझाद यांसारखे क्रांतिकारक तर नेताजी बोस, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी आदी देशभक्तांचा जीवनसंघर्ष नाट्यरुपात मुलांनी रंगमंचावर सादर केला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वीर बाजी पासलकर स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ पासलकर, समस्त हिंदु आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच गोरक्षक चैतन्य देशपांडे उपस्थित होते. सेवागिरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आशाताई कुलकर्णी, सचिव अमित कुलकर्णी, खजिनदार कुमार कुलकर्णी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक राजेंद्र गोंदिल, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नीलेश गायकवाड यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

यावेळी राजाभाऊ पासलकर म्हणाले की, भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी जिजामाता विद्यालयाकडून होत असलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.

संपूर्ण कार्यक्रम पाहिल्याने कुंभमेळ्यात स्नान केल्याचे भाग्य आपल्याला लाभले, असे गौरवोद्गार मिलिंद एकबोटे यांनी काढले.

त्यानंतर आशाताई कुलकर्णी म्हणाल्या की, खरा भारताचा सुजाण नागरिक घडवायचा असेल तर मराठी माध्यमांच्या शाळेशिवाय पर्याय नाही. या शाळेतून होणारे विविध उपक्रमच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण वाढीस पोषक ठरू शकतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.