Pimpri News: मंत्रालयातून ‘वाघाची’ एंट्री रोखली?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रतिनियुक्तीने जितेंद्र वाघ यांची नियुक्ती होऊन एक महिन्याचा कालावधी उलटूनही नगरविकास विभागाने त्यांना अद्याप ‘ग्रीन सिग्नल’ दिला नाही. पिंपरी महापालिकेतील ‘कलेक्टर’ अशी ओळख असलेल्या एका अधिका-यानेच नगरविकास कार्यालयातील एका मित्राला हाताला धरुन ही बदली लांबविल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे आहेत. राज्य सेवेतील दोन आणि स्थानिक अधिका-यांमधून एक अशी विभागणी आहे. प्रतिनियुक्तीवरील विकास ढाकणे आणि स्थानिक अधिका-यांमधील उल्हास जगताप असे दोन अतिरिक्त आयुक्त आहेत. तर, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना कार्यमुक्त केल्यानंतर सहा महिन्यांनी शासनाने राज्याच्या महसूल विभागातील अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (जमीन) या पदावरून जितेंद्र वाघ यांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रतिनियुक्तीने नेमणूक केली. त्याची ऑर्डर 17 सप्टेंबर 2021 रोजी निघाली. त्याला एक महिना उलटून गेला. तरी, वाघ अद्याप महापालिकेत रुजू झाले नाहीत.

वाघ महसूल विभागातील असल्याने महापालिकेत रुजू होण्यासाठी नगरविकास विभागाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पण, एक महिना उलटून गेला. तरी, ही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगरविकास विभागाने महिना उलटून गेला. तरी, वाघ यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिला नाही. त्याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला असता एक वेगळीच माहिती समोर आली. महापालिकेतील एका ‘कलेक्टर’नेच नगरविकास कार्यालयातील एका मित्राला हाताला धरुन ही बदली लांबविली असल्याचे समजले.

राज्य सेवेतील दुसरा अतिरिक्त आयुक्त नसल्याने विकास ढाकणे यांच्याकडे सर्व अधिकार एकवटले आहेत. त्यांच्याकडे महत्वाच्या तब्बल 31 विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात प्रशासन, नगररचना, स्थापत्य मुख्यालय, स्थापत्य (उद्यान), शिक्षण मंडळ (प्राथमिक), माध्यमिक शिक्षण विभाग, झोनिपू (स्थापत्य) विभाग, अग्निशामन विभाग, उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग, स्थापत्य प्रकल्प, आरोग्य विभाग (स्वच्छ भारत, महाराष्ट्र अभियानसह), मध्यवर्ती भांडार विभाग, बांधकाम परवानगी, क्रीडा, वैद्यकीय विभाग, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, विद्युत मुख्य कार्यालय (दुरसंचारसह), आपत्ती व्यवस्थापन, नागरवस्ती विकास योजना विभाग, बीएसयुपी, ई्डब्ल्यूस प्रकल्प, बीआरटीएस प्रकल्पाचे, निवडणूक, जनगणना (आधारसह), पशुवैद्यकीय, कर आकारणी व करसंकलन विभाग, आकाशचिन्ह व परवाना विभाग, स्थानिक संस्था कर (एलबीटी), अतिक्रमण मुख्य कार्यालय (अनधिकृत बांधकम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलन विभाग), भूमि आणि जिंदगी, झोनिपू, पाणीपुरवठा व जलनि:सारण आणि पाणीपुरवठा सेक्टर 23, पर्यावरण अभियांत्रिकी अशा महत्वपूर्ण विभागाची जबाबदारी आहे.

आयुक्त राजेश पाटील ही त्यांच्याच कलाने कारभार करत असल्याची तक्रार काही अधिकारी खासगीत करत आहे. ढाकणे यांच्या कार्यशैलीवरही अधिकारी नाराजी व्यक्त करत आहेत. तर, स्थानिक अधिका-यांमधून अतिरिक्त आयुक्त असलेले उल्हास जगताप यांच्याकडे सर्व क्षेत्रीय कार्यालये व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग (सार्वजनिक वाचनालय, प्रेक्षागृहासह) कायदा, सभाशाखा, आयटीआय मोरवाडी, कासारवाडी, कार्यशाळा विभाग, अभिलेख कक्ष, कामगार कल्याण विभाग, सुरक्षा विभाग आणि माहिती व जनसंपर्क अशा नऊ विभागाची जबाबदारी गेण्यात आली आहे.

याबाबत जितेंद्र वाघ यांना विचारले असता ते म्हणाले, ”पुणे मेट्रो रेल विभागातून मी कार्यमुक्त झालो आहे. नगरविकास विभागाची प्रक्रिया राहिली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी पिंपरी महापालिकेत रुजू होईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.