Pune News :महापालिकेच्या कार्यालयीन सहायक २०० पदांसाठी नोकरभरती

कंत्राटी पद्धतीवर कर वसुली आणि नवीन कर आकारणीसाठी होणार भरती

एमपीसी न्यूज : थकीत मिळकत कर वसूल करण्यासाठी अभय योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून किमान एक हजार कोटी रुपयांची थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परंतु, पालिकेच्या करसंकलन व कर आकारणी विभागाकडे त्याकरिता पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे महापालिका मिळकत कर विभागासाठी कंत्राटी पद्धतीने कार्यालयात सहायकांची २०० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे बेरोजगार युवांना रोजगाराची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.

पुणेकरांकडून कर संकलनासोबत नवीन मिळकतींना कर आकारणी करण्याचे काम या मनुष्यबळा मार्फत केले जाणार आहे. आतापर्यंत महापालिकेला मिळकत करांमधून ८५० कोटींचा महसूल मिळाला आहे. यामध्ये आणखीन ५०० ते ७०० कोटींची भर पडू शकते. लॉकडाऊन कार्यकाळात महापालिकेचे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होत आहे. परिणामी महापालिकेचा आर्थिक कणा मोडला आहे.

त्यामुळे विविध मार्गातून पालिकेसमोर आर्थिक उत्पन्न वाढविण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. हे उत्पन्न वाढविण्यासाठी स्थायी समितीमार्फत वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी अभय योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना लागू करण्यात आल्यापासून ४४ कोटी २५ लाख रुपयांचा महसूल पालिकेला प्राप्त झाला आहे. हा महसूल एक हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा प्रयत्न अाहे.

कोरोना ड्युटीसाठी देण्यात आलेले मनुष्यबळ सुद्धा परत मागविण्यात आले आहे. त्यानुसार प्रशासन विभागाकडून मिळकत कर विभागाला मनुष्यबळ परत देण्यास सुरुवातही झाली आहे. आगामी नव्या भरती प्रक्रियेमुळे रोजगार निर्मिती होईल. त्यांच्या माध्यमातून अभय योजनेतून कोट्यवधींचा महसूल मिळेल, असा विश्वास रासने यांनी यावेळी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.