Pimpri : पत्रकार विजय जगताप यांच्या ‘सारिपाट महाविकास आघाडीचा’ या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन

Journalist Vijay Jagtap's book 'Saripat Mahavikas Aaghadicha' soon to be published.

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडी सरकार निर्मितीचा आश्चर्यकारक,धक्कादायक व थरारक इतिहास आता पुस्तक रूपात येत असून पुढील आठवड्यात मुंबईत त्याचे प्रकाशन होत आहे.

विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गो-हे यांनी या पुस्तकासाठी प्रस्तावना दिली आहे. महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहिला तर मागील 25 वर्षांत एकाही राजकीय पक्षाला स्वबळावर एकहाती सरकार बनवता आलेलं नाही.

सहा वर्षापासून देशाला झपाटून टाकणारी मोदी लाट येऊनही महाराष्ट्रात भाजपला ते शक्य होऊ शकलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे.

मात्र 2019 ची झालेली निवडणूक व त्यानंतरचा सरकार स्थापनेचा प्रवास हा अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेला आहे.

या संदर्भात जगताप यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘तीन पक्षांच्या महाविकास आघाडी विरूध्द भाजप अशा रंगलेल्या या सामन्यात इतके डाव-प्रतिडाव, खेळया कुरघोड्या, अडथळे व अडचणींची मालिका आजपर्यंत कधीच कुठल्या सरकार निर्मितीमध्ये झाल्याची इतिहासात नोंद नाही. म्हणूनच पत्रकार या नात्याने मला महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीचा दस्ताऐवज नोंद व्हावा असे वाटले.’

भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन बनलेल्या या महाविकास आघाडीचा प्रयोग हा नुसता सत्तेसाठी बनला नव्हता तर आत्ताच जर आपण तगलो नाही तर वाहून जाण्याची भिती शिवसेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादी या तीनही पक्षांना होती.

गोष्टीतील कथेप्रमाणे एक लाकूड कोणीही तोडेल, परंतू लाकडांची मोळी बनली तर कोणालाच तोडता येणार नाही हे समूहशक्ती दाखविणारा सिध्दांत या महाविकास आघाडीतील दिसून आला.

हा प्रयोग पाच वर्ष टिकेल की नाही हे आज जरी सांगता येत नसलं तरी कोणी एकानं जरी बाहेर पडायचं ठरवलं तरी ते तिघांनाही धोकादायक ठरू शकतं.. हे वास्तव तिघेही जाणतात.

मात्र मोदींना रोखता येतं, हा मेसेज फार प्रभावीपणे या सरकारच्या स्थापनेतून देशाला दाखवून देण्याचं काम महाराष्ट्राने केले आहे, असं निरीक्षण जगताप यांनी मांडलं.
हा सारा सत्ता निर्मितीचा थरारक पट शब्दबद्ध केलेले “ सारिपाट महाविकास आघाडीचा” या नावाचे पहिले मराठी पुस्तक आता ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही स्वरूपात वाचकांना उपलब्ध होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.