Journey of Jyotikumari : ‘आत्मनिर्भर’-  ज्योतीचा प्रेरणादायी प्रवास

'Self-reliance' - Jyoti's inspiring journey, she covered more than 1200 km by cycle ज्योती कुमारीचा हा प्रवास सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर सर्व स्तरातून तिचं कौतुक झालं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीनेही ज्योतीचं कौतुक केलं.

एमपीसी न्यूज – करोनाची साथ सुरु झाली आणि देशभर लॉकडाऊन जाहीर झाला. ज्याला त्याला आहे तिथेच राहावे लागले. पण काही दिवस गेल्यावर प्रत्येकाला आपल्या पोटाची भूक सतावू लागली. मग अशा वेळी मूळ गावी परत गेल्यास दोन वेळचे जेवण तरी मिळेल असे वाटल्याने अनेकांनी आपल्या गावचा रस्ता घरला. त्यात अतोनात हाल झाले, उपासमार झाली. पण तरीदेखील गावी पोचण्यासाठी लोकांनी धडपड केलीच.

अशाच आपत्तीत सापडलेल्या एका धाडसी मुलीने आपल्या वडिलांना सायकलच्या मागच्या सीटवर बसवून हरियाणातील गुडगावपासून बिहारपर्यंत १२०० किमीचा प्रवास केला. ज्योती कुमारीचा हा प्रवास सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर सर्व स्तरातून तिचं कौतुक झालं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीनेही ज्योतीचं कौतुक केलं. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला लॉकडाउन संपल्यानंतर दिल्लीत ट्रायल्स देण्यासाठी बोलावलं होतं. परंतु ज्योतीने ही ऑफर नाकारत आपलं शिक्षण पूर्ण करण्याला पहिलं प्राधान्य दिलं. ज्योतीच्या याच संघर्षाची कथा आता रुपेरी पडद्यावर येणार आहे.

Wemake Filmया कंपनीने ज्योतीच्या या संघर्षमय कहाणीचे हक्क विकत घेतले असून ऑगस्ट महिन्यापासून चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘आत्मनिर्भर’ असं ठेवण्यात आलं असून यामध्ये ज्योती छोटीशी भूमिकाही करणार आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या चित्रपटात ज्योतीच्या कहाणीसोबतच लॉकडाउन काळात तिला वडिलांसोबत सायकलने प्रवास का करावा लागला?  या प्रश्नाचाही वेध घेतला जाणार असल्याचं कळतंय. ही ऑफर स्वीकारुन मला खूप आनंद होतोय अशी प्रतिक्रिया ज्योतीने पीटीआयशी बोलताना दिली.

गुडगाव ते दरभंगा या मार्गावर या सिनेमाचं चित्रीकरण होणार असून, या प्रवासादरम्यान तिला काय-काय अनुभव आले हे आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक शाईन क्रिष्णा यांनी सांगितलं. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी आणि मैथिली भाषेत बनवला जाणार असून अन्य भाषांमध्येही या चित्रपटाचं डबिंग केलं जाणार आहे. या चित्रपटात ज्योतीच्या वडिलांची भूमिका कोण करेल हे अद्याप निश्चीत झालेलं नसल्याचं दिग्दर्शकांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी हा चित्रपट ‘A Journey of a Migrant’ या नावाने प्रसिद्ध होईल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.