Junnar: दैनिक पुण्यनगरीचे संपादक मुरलीधर उर्फ बाबा शिंगोटे यांचे निधन

वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्रसमूहाचा मालक हा त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास होता. : Murlidhar alias Baba Shingote, editor of Dainik Punyanagari passed away

एमपीसी न्यूज – दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्रसमूहाचे मालक, संस्थापक -संपादक मुरलीधर उर्फ बाबा शिंगोटे यांचे दीर्घ आजाराने जुन्नर येथे आज (गुरुवारी) निधन झाले. वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्रसमूहाचा मालक हा त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास होता. बाबा या टोपणनावाने राज्याला परिचित होते.

बाबांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उंब्रज या गावी 7 मार्च 1938 ला झाला.  इयत्ता चौथी शिक्षण झालेल्या बाबांनी शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी मुंबई गाठली. त्या ठिकाणी सुरुवातीला फळ विक्री, त्यानंतर वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरू केले.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मुंबईतल्या फाऊंटन परिसरात आंदोलन झाले होते. त्याचे बाबा साक्षीदार होते.

वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. 1994 मध्ये मुंबई चौफेर नावाचे सायं दैनिक सुरू केले.

यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभूमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ 1999 मध्ये रोवली.

मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते.

काही दिवसांपासून ते आजार होते. त्यांचे जन्मगाव असलेल्या गायमुखवाडी (ता. जुन्नर) येथे आज दुपारी एकच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सामाजिक अंतर राखण्यासंबंधी नेमून दिलेल्या नियमांचे पालन करुन जन्मगावी  गायमुख वाडी येथे  अंत्यसंस्कार होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.