Junnar News : आयएएस संकेत भोंडवे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार’ प्रदान

एमपीसी न्यूज – आयएएस संकेत शांताराम भोंडवे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शिवनेरी गडावर आज (शुक्रवार, दि,19) शिवजयंती कार्यक्रम प्रसंगी भोंडवे यांना हा पुरस्कार देण्यात आला. किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळ समितीच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.

किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, आमदार विनायक मेटे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे उपस्थित होते.

मानपत्र व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आयएएस संकेत शांताराम भोंडवे हे सध्या भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतुक व परिवहन मंत्रालयाच्या सचिव पदी कार्यरत आहेत. संकेत भोंडवे मूळचे पिंपरी – चिंचवडचे असून त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण येथेच झाले. भोंडवे यांनी अथक परिश्रम घेऊन चौथ्या प्रयत्नात 14 मे 2007 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत देशात विद्यार्थ्यांमध्ये 134 वा क्रमांक पटकावला. त्यानंतर मध्यप्रदेश केडरसाठी त्यांची नियुक्ती झाली. या दरम्यान त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.

प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपला ठसा उमटवला. याचे फलित म्हणून दिव्यांग कल्याण, ज्येष्ठ नागरिक कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2017 मध्ये त्यांना विविध पुरस्कार मिळाले. बारा ज्योतिर्लिंगांमधील एक असलेल्या उज्जैन येथे दिव्यांगांसाठी तयार केलेल्या खास सुविधांसाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

पुरस्कार निवड समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. आमोल कोल्हे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आमदार अतुल बेनके यांचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.