Junnar News: आमदार अतुल बेनके यांच्याविरोधात न्यायालयात याचिका

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात वेगवेगळे पॅन नंबर आणि इतर बाबतीत खोटी माहिती दिल्याचा आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्ते अनिल भांगरे, डॉ. अभिषेक हरिदास यांनी जुन्नर कोर्टात आज (बुधवारी) याचिका दाखल केली आहे.

याबाबतची माहिती भांगरे, हरिदास यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. त्यांनी म्हटले आहे की, आमदार अतुल बेनके यांनी त्यांच्या 2014 व 2019 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात वेगवेगळे पॅन नंबर दिले आहेत. त्यांच्या पत्नी एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालिका असल्याचे लपवले आहे. एवढेच काय तर त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता देखील लपवली आहे. या सर्व बाबतीत खात्री करूनच आम्ही न्यायालयात धाव घेतली.

कायदा फक्त सामान्य जनतेला लागू होतो का, राजकीय नेत्यांना लागू होत नाही का, निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणे म्हणजे एक प्रकारे लोकशाही धोक्यात आणण्यासारखेच आहे.

अनेक लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देतात. लोकशाही बळकट व्हावी. या शुद्ध हेतूने आम्ही न्यायालयात खोटी प्रतिज्ञापत्र भरणाऱ्या लोकप्रतिनिधी विरोधात याचिका दाखल करणार असल्याचे, भांगरे यांनी सांगितले.

याबाबत आमदार अतुल बेनके यांच्याकडे संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.