Junnar: किल्ले निमगिरी येथे दुर्गसंवर्धन, वृक्षारोपण, ग्रंथदिंडी अन्‌ श्रमदान

सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम

एमपीसी न्यूज- दिवंगत गिर्यारोहक रमेश गुळवे यांच्या स्मरणार्थ आरमार्क (रमेश स्मृती सामाजिक पुनुरूत्थान उपक्रम)अंतर्गत जुन्नर येथील किल्ल्यावर श्रमदान, जनजागृती, वृक्षारोपण, ग्रंथदिंडी व अभ्यासपूर्ण दुर्गभ्रमंती असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले होते. 22, 23 डिसेंबर दोन दिवस सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविण्यात आले. याबाबतची माहिती मुख्य समन्वयक एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांनी दिली.

पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी (ति.22)किल्ले निमगिरी येथे दुर्गसंवर्धनास हातभार लागण्यासाठी किल्ल्यावर श्रमदान मोहीम राबविण्यात आली. यामध्ये किल्ल्यावरील बुजलेल्या टाक्यातील माती खोदून काढून टाकण्यात आली. सागरमाथाच्या व सिंहगड प्रतिष्ठानच्या 40 सदस्यांनी मिळून एकत्रित श्रमदान केले.त्याच दिवशी संध्याकाळी किल्ल्याच्या प्रभावळीतील गावक-यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ सर्पदंशतज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी सर्पदंश व त्यावरील प्रथमोपचार या विषयावर ‘स्लाईड शो’ सह मार्गदर्शन केले. यामध्ये सुमारे 250 ते 300 गावक-यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

रविवारी (दि.23) निमगिरी गावात पुस्तकांची ग्रंथदिंडी काढण्यात आली. या दिंडीत महात्मा फुले विद्यालय, भोसरी येथील स्काऊट, आर.एस.पी. आणि एमसीसीचे विद्यार्थ्यी आपल्या बॅ॑डपथकासह सामील झाले होते. तर, स्थानिक जि.प.प्राथमिक शाळेतील व न्यू इंग्लिश स्कूल, निमगिरी येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी टाळ मृदंग व ढोलताशांचा गजर करत ग्रंथदिंडीला शोभा आणली. यावेळी सुमारे 200 हून अधिक पुस्तके शाळेला भेट देण्यात आली.

त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना दुर्गअभ्यासक विनायक खोत यांच्या मार्गदर्शनासह किल्ले निमगिरीवर अभ्यासपूर्ण दुर्गभ्रमंती करण्यात आली. यामधे भोसरी येथील महात्मा फुले विद्यालय, तसेच निमगिरी व खोडद येथील शाळेचे मिळून सुमारे 150 विद्यार्थी सहभागी झाले होते. दरम्यान, महात्मा फुले विद्यालयाचे संचालक मंडळ आणि रमेश गुळवे यांचे कुटुंबिय यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी वृक्षारोपण केले.

भोसरी येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेमार्फत दरवर्षी आरमार्क – दि फोर्ट मॅरेथॉन ही स्पर्धा वेगवेगळ्या किल्ल्यावर भरवण्यात येत असे. यावर्षीपासून या उपक्रमात आमूलाग्र बदल करण्यात आला असून त्याविषयी बोलताना संस्थेचे सचिव प्रशांत पवार म्हणाले, ”गडकिल्ल्यांचे महत्त्व व दुर्गसंवर्धनाची गरज ओळखून त्याविषयीचा संदेश समाजापर्यंत पोहोचण्यासाठी दिवंगत रमेश गुळवे यांनी 2007 साली सलग तीन दिवसात तेवीस किल्ले सर करण्याची मोहीम राबविली होती. दुर्दैवाने सागरमाथाच्या “मिशन एव्हरेस्ट 2012″ मोहिमेदरम्यान रमेश यांचे निधन झाले. त्यानंतर सन 2013 पासून रमेश यांच्या स्मरणार्थ सागरमाथाच्या माध्यमातून दरवर्षी रमेश यांनी सर केलेल्या तेवीस किल्ल्यापैकी एका किल्ल्यावर, किल्ला चढाई स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात झाली. मागील पाच वर्षात किल्ले राजमाची, किल्ले लोहगड व विसापूर, किल्ले सिंहगड, किल्ले मल्हारगड आणि गतवर्षी किल्ले शिवनेरी येथे ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करण्यात आली”.

”परंतु, गेल्या काही वर्षांपासून असं जाणवू लागलं की, या स्पर्धेच्या मूळ संकल्पनेला मागे सारून ब-याच स्पर्धकांमधे फक्त आर्थिक बक्षिसांसाठी जीवघेणी धावपळ होत आहे. तसेच अतिवेगाने पळण्याच्या चढाओढीमुळे व अतिश्रमामुळे अंतिम टप्प्यात ब-याच जणांना त्रास होत आहे. त्यामुळे स्पर्धेच्या बाबतीत सहभागी स्पर्धकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आम्हाला प्रकर्षाने जाणवला. मुख्य उद्देश साध्य होत नसल्याने व स्पर्धेकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा प्रकर्षाने जाणवत असल्याने यावर्षी पासून आरमार्क स्पर्धेत आमूलाग्र बदल केला. यंदापासून रमेश यांच्या मुख्य उद्देशाला अनुसरुन व सामाजिक बांधिलकी जपत नव्या स्वरूपातील रमेश स्मृती सामाजिक पुनरूत्थान उपक्रम आयोजित केला” असेही पवार यांनी सांगितले.

या उपक्रमांसाठी जुन्नर वनविभागाचे म्हसे पाटील साहेब, यश मस्करे, रमेश खरमाळे, डॉ. सदानंद राऊत, महात्मा फुले विद्यालयाच्या शिक्षण संस्थेचे निळकंठ लोंढे, विश्वनाथ लोंढे तसेच इतर संचालक मंडळ इनामदार सर, केदारी सर, राहुल तापकीर, महेशदादा स्पोर्टस् फांऊडेशन, योगेश गवळी, संतोष फुगे, नंदकुमार तापकीर, संदीप खराबे, चंद्रकांत वाघमारे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. त्याचबरोबर मराठी देशा फाऊंडेशन, सिंहगड प्रतिष्ठान व हाईट्स ट्रेकिंग क्लब यांचेही सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.