Pimpri : परोपराकरात खरे जीवन – घुले महाराज

जुन्नर तालुका मित्र मंडळाचा वर्धापन दिन

एमपीसी न्यूज – जो परोपकारासाठी जगतो, तोच खरे जीवन जगतो, असे प्रतिपादन ह.भ.प.पांडूरंग महाराज घुले यांनी भोसरी येथे केले.  जुन्नर तालुका मित्र मंडळाच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त घुले महाराज यांना जुन्नर भूषण तर आमदार शरद सोनवणे यांना जुन्नर विकासरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्काराला उत्तर देताना घुले महाराज बोलत होते. कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शिवाजीराव आढळराव होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती विशाल तांबे, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेविका अनुराधा गोफणे, मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे, अशोक खांडेभराड व्यासपीठावर उपस्थित होते.

घुले महाराज म्हणाले की, मी सत्कारासाठी कुठे जात नाही. परंतु हा माझ्या मातीतील पुरस्कार असल्यामुळे मला डावलता आला नाही. मी चाकण येथे राहत होतो त्यावेळी माधुकरी मागून मी दिवस काढले. आजच्या पिढीला हा त्रास होवू नये यासाठी जुन्नर तालुका मित्र मंडळाकडून विद्यार्थी वसतीगृहाची मागणी होत आहे. ही मागणी पुर्ण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर आमदार शरद सोनवणे म्हणाले की, राजकारणात संयम महत्त्वाचा आहे. तर राजकारण आणि पदापेक्षा आपल्या मागे उभा राहणारा समाज महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा पुरस्कार आपल्यामागे उभा राहणाऱ्या समाजाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

अध्यक्षीय भाषणात खासदार आढळराव यांनी जुन्नर तालुक्‍यातील विविध प्रलंबित विषयांना हात घातला. पुणे-नाशिक महामार्गाच्या सहापदरी रुंदीकरणाबाबत ते म्हणाले की, नाशिकफाटा ते राजगुरुनगर या 38 किलोमीटर रस्त्यापैकी 15 किलोमीटरचा रस्ता सरकारच्या ताब्यात आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्या हद्दीत रस्ता रुंदीकरणात फेरबदल केल्याने हे काम धिम्या गतीने सुरु होते. मात्र, आपला सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. नारायणगाव बाह्य वळण रस्ता, खेड घाटासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत 68 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

मेघराज राजे भोसले म्हणाले, जुन्नर तालुक्‍याने सांस्कृतिक क्षेत्राला अनेक रत्ने दिली. जुन्नर तालुक्‍याशी माझी नाळ जोडली गेली असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार महेश लांडगे व महापौर राहुल जाधव यांनी पिंपरी-चिंचवडमधील जुन्नर तालुकावासियांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले.
यावेळी ठिकेकरवाडी गावाला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार, बेल्हे येथील समर्थ महाविद्यालयास शिवजन्मभूमी गौरव पुरस्कार तसेच याखेरीज विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भोसरी येथील शिवनेर पतसंस्था (सहकार), शिवाजीराव चाळक (साहित्य), मंगेश आमले (उद्योजक), बाळकृष्ण नेहरकर (कला व सांस्कृतिक), निशा पिसे (पत्रकार), अक्षय बोऱ्हाडे (सामाजिक), निलेश घोलप (आदर्श शेतकरी), राहुल खर्गे (क्रीडा), इंदिरा आस्वार डावरे (प्रशासकीय), सार्थक मटाले (विशेष प्राविण्य) यांना गौरविण्यात आले.

मंडळाचे संपर्क प्रमुख उल्हास पानसरे, सचिव ऍड. संतोष काशिद, उपाध्यक्ष कैलास आवटे, सुहास गटकळ, खजिनदार मिननाथ सोनवणे, अण्णा मटाले, सुनील पाटे पाटील, तुषार सहाणे, निलेश मुटके, योगेश आमले, एस. आर. शिंदे, नवनाथ नलावडे, मुकुंद आवटे, कैलास आवटे, बबूशेठ मुटके, अतुल गुंजाळ, उत्तम महाकाळ, विजय ढगे, वैभव हांडे, सुहास वाघ, दीपक सोनवणे, अमोल बांगर, इंद्रजित पाटोळे, ऍड. महेश गोसावी, श्‍वेता पाटे, स्वप्निल पोखरकर यांनी संयोजनात पुढाकार घेतला आहे. बाळकृष्ण नेहरकर यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम झाला.

अन्‌ आम्ही आमदार झालो!
जुन्नर तालुक्‍यातील कुसूर हे गाव दत्तक घेतले हा क्षण माझ्या जीवनाचा सार्थक करणारा ठरला, असे आमदार महेश लांडगे यांनी नमूद केले. समाजकारणात राजकारणात शरद सोनवणे यांच्यासारखा चांगला मित्र मिळाला. जुन्नर तालुक्‍यातील एका लग्नाच्या निमित्ताने शरद सोनवणे व मी भेटलो. तेथे एका चहाच्या टपरीवर चहा पित असताना काहीही झाले तरी आमदार व्हायचा हा संकल्प आणि सोडला. खूप आव्हाने आमच्यासमोर होती. मात्र, आम्ही एकाच दिवशी आमदार झालो. शरद सोनवणे मनसेचे एकमेव आमदार झाले तर मी अपक्ष म्हणून एकटा लढलो, अशी आठवण आमदार लांडगे यांनी सांगताच सभागृहात हास्याचा फवारा उडाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.