Junnar : रखडलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला सुरुवात; खासदार डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या वचनपूर्तिकडे पहिले पाऊल टाकले आहे. गेले अडीच वर्षे रखडलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला सुरुवात करण्यात डॉ. कोल्हे यांना यश आले आहे. आज (मंगळवारी) नारायणगाव बायपासच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अधिवेशन असल्यामुळे डॉ. कोल्हे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.

केवळ आपल्या उपस्थितीसाठी किंवा श्रेयवादासाठी काम रखडू नये. वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी स्थानिक लोकप्रतिनीधींच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यास सांगितले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, राष्ट्रवादीचे जुन्नर तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, अनिल मेहेर, प्रकाश पाटे, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, बबनराव तांबे, नॅशनल हायवे प्रकल्प समितीचे मुख्य समन्वयक वरूण भुजबळ, मुकेश वाजगे, सुरज वाजगे, संजय वारुळे, विपुल फुलसुंदर, रवींद्र पारगावकर, अरविंद लंबे, दिलीप कोल्हे, राजेश कोल्हे, रोहिदास केदारी, गणेश वाजगे, नॅशनल हायवे अधिकारी शर्मा साहेब, अरुण चौधरी आदी उपस्थित होते.

गेले अडीच वर्षे नारायणगाव बायपासचे काम रखडले होते. डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर मतदारसंघात येऊन रखडलेल्या खेड घाटाची पाहणी केली. संबंधित अधिका-यांची तातडीने बैठक घेतली. त्यामध्ये पुणे-नाशिक हायवे संदर्भातील खेड ते आळेफाटा दरम्यानच्या खेड घाट व पाच बायपासचे रखडलेल्या कामांचा विषय समोर आला. संबधित खेड घाट नारायणगाव बायपासची निविदा होऊन सहा महिने झाले. तरीही, कंत्राटदार व नॅशनल हायवे यांच्यामध्ये कामाची कुठलीही वर्कऑर्डर, एग्रीमेंट इत्यादी तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नव्हती.

खासदार डॉ. कोल्हे यांनी तातडीने पावले उचलली. जिल्हाधिका-यांची भेट घेऊन भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे नॅशनल हायवेचे वित्त आणि प्रशासनाचे प्रमुख आशिष शर्मा यांची भेट घेतली. कंत्राटदाराला संबंधित कामाची वर्कऑर्डर तात्काळ अदा करून तांत्रिक बाबी सोडवण्याची विनंती केली. यावर तत्काळ सर्व संबंधित अधिका-यांना प्रलंबित असलेल्या तांत्रिक बाबी युद्धपातळीवर सोडवून काम चालू करण्याच्या सूचना डॉ.अमोल कोल्हे यांच्या विनंतीनुसार गडकरी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार गेले अडीच वर्षे प्रलंबित असलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला आजअखेर प्रत्यक्ष मुहूर्त मिळाला आणि काम चालू झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.