Jupiter Saturn Meets :गुरू आणि शनि ग्रहांची महायुती अनुभवण्याची सुवर्णसंधी आज

एमपीसी न्यूज : महायुतीची अनुभूती घेण्याची सुवर्णसंधी लवकरच उपलब्ध होणार आहे. ही महायुती राजकीय पक्षांची नसून सुर्यमालेतील सर्वात मोठ्या आकारांच्या ग्रहांची आहे. सोमवारी म्हणजे 21 डिसेंबरला संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत पश्चिम क्षितीजावर गुरु आणि शनी या दोन ग्रहांची महायुती बघायला मिळणार आहे.

 आकाशातील युती म्हणजे दोन ग्रह किंवा तारे हे आकाशात जवळ दिसणं. अर्थात युतीमध्ये आकाशात डोळ्यांनी दोन गोष्टी जवळ जरी दिसत असल्या तरी त्यांच्यामध्ये भौगोलिक अंतर असतेच. तर या महायुतीमध्ये काय होणार आहे की गुरु आणि शनी हे दोन ग्रह आकाशात नुसते जवळ दिसणार नसून ते एकाच ताऱ्याप्रमाणे – एकच ठिपका असल्यासारखे दिसणार आहेत. म्हणजेच नुसत्या डोळ्यांनी गुरु कोणता किंवा शनी कोणता असा फरक करता येणार नाही. महायुती ही अवकाशातील एक नैसर्गिक – अवकाशातली घटना आहे.

एरवी आकाशात वेगवेगळ्या ठिकाणी गुरु आणि शनी ग्रह दिसतात. हे ग्रह दुर्बिणीतून बघण्यासाठी वेगवेगळ्या कोनात दुर्बिण सेट करायला लागायची. गेले काही दिवस हे दोन्ही ग्रह आकाशात एकमेकांच्या जवळ येत आहेत. सोमवारी उघड्या डोळ्यांनी किंवा दुर्बिणीच्या एका कोनातच दोन्ही ग्रह बघायला मिळतील.

तर नेमके किती वाजता ? रात्रभर ? आकाशात कोणत्या दिशेला ?……तर साधारण दक्षिण-पश्चिम क्षितीजावर ( पश्चिमेच्या दिशेने ) जेमतेम दोन तास. संध्याकाळी 6 ते 8 च्या दरम्यान. आता याच वेळी का ?……तर आठ नंतर हे दोन्ही ग्रह पश्चिमेला मावळणार आहेत. सहाच्या आधी हे दोन्ही ग्रह जरी एका ठिपक्याप्रमाणे दिसत असले तरी सुर्यप्रकाशामुळे ते जाणवणार नाही. अशी ही अनोखी खगोलीय घटना जगभर मोठ्या उत्सुकतेने बघितली जाणार आहे.

गुरु ग्रहाला सुर्याभोवती फिरायला सुमारे 11 वर्ष 8 महिने लागतात. तर शनी ग्रहाला सुर्याभोवती एक प्रदक्षणा पुर्ण करायला तब्बल 29 वर्ष सहा महिने लागतात. पृथ्वी ही सुर्यापासून सुमारे 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे.  गुरु ग्रह हा सुमारे 77 कोटी किलोमीटर तर शनी ग्रह हा सुर्यापासून सुमारे 143 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. साधारण दर 20 वर्षांनी गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह सुर्याभोवती प्रदक्षणा घालतांना एकमेकांच्या जवळ येतात, आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 20 वर्षांनी सुर्याभोवती फिरतांना दोन्ही ग्रह काही काळ समांतर प्रवास करतात. या काळांत गुरु आणि शनी यामध्ये सुमारे 70 कोटी किलोमीटर एवढे अंतर असते, आताही महायुतीच्या वेळी साधारण असंच काहीसं अंतर असणार आहे.

गुरु आणि शनी ग्रहांचा समांतर प्रवास सुरु असतांना दोन्ही ग्रहांच्या सरळ रेषेत जर पृथ्वी आली तर पृथ्वीवरुन गुरु आणि शनी हे दोन ग्रह वेगवेगळे न दिसता एकाच ताऱ्याच्या ठिपक्याप्रमाणे दिसणार. नेमकं आता तेच होणार आहे. अशी भौगोलिक परिस्थिती 1623 ला आली होती. नुकतंच तेव्हा कुठं दुर्बिणींच्या माध्यमातून ग्रहांच्या निरिक्षणाला सुरुवात झाली होती. तेव्हा कदाचित गॅलिलिओ किंवा अन्य खगोल अभ्यासकांनी तो महायुतीचा क्षण नक्कीच अनुभवला असेल.

म्हणजे आता सुमारे 400 वर्षांनी गुरु आणि शनी ग्रहांच्या महायुतीचा योग आला आहे. सोमवारचा योग चुकला तर पुन्हा आपल्याला 2080 पर्यंत थांबावे लागेल.

या दोन्ही ग्रहांचा गेली अनेक वर्ष अभ्यास सुरु आहे. विविध कृत्रिम उपग्रह या दोन्ही ग्रहांजवळ पाठवत या ग्रहांची आत्तापर्यंत ढिगभर माहिती उपलब्धही झाली आहे. तेव्हा महायुतीच्या निमित्ताने हे दोन्ही ग्रह जरी बघितले जाणार असले तरी एखादा नवीन शोध – माहिती हाती येण्याची शक्यता नाहीये. तरीही कोणास ठावूक….नवीन काहीतरी माहित होईलसुद्धा.

तेव्हा शहरांतील कृत्रिम प्रकाशापासून दुर जात मोकळं क्षितीज असलेली, उंच जागा निवडा आणि उघड्या डोळ्यांनी या खगोलीय घटनेचा आनंद लुटा. तुमच्या आसपास हौशी खगोल संस्था – अभ्यासक असतील तर त्यांच्या मदतीने खगोल दुर्बिणीतून या अनोख्या पर्वणीचा आनंद लुटा. तेही शक्य झालं नाही तर ढिगभर संकेतस्थळांच्या माध्यमातून जगभरातून दिसणारा महायुतीचा आखो देखा हाल घरबसल्या नक्की बघा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.