Dehu : वृक्षारोपणा इतकेच वृक्ष संगोपणाला महत्व द्या – गौरी सावंत

एमपीसी न्यूज – वाढते नागरीकरण तसेच औद्योगिक वापरासाठी बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. परिणामी निसर्गाचा समतोल बिघडला आहे. यासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन काळाची गरज असल्याचे मत मॉडर्न इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका गौरी सावंत यांनी व्यक्त केले.

मॉडर्न हायस्कूल इंग्रजी माध्यम व रोटरी क्लब यांच्या वतीने देहू येथील वनविभागात आयोजित वृक्षारोपण प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पल्लवी कुलकर्णी, क्रीडा शिक्षक मधुकर रासकर, रोटरीचे बहार शहा, दीपा जावडेकर उपस्थित होते. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह शरद इनामदार, व्हिजिटर मृगजा कुलकर्णी यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

देहूगावातील गाथाग्राम येथे जैव विविधता उद्यान आहे. या उद्यानात अनेक जंगली झाडे आहेत. यातील मोकळ्या जागेत विद्यार्थ्यांकडून अनेक झाडे लावण्यात आली. आयुर्वेदातील अनेक वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा महत्वाच्या वनस्पतींचे जतन व्हावे यासाठी तुळस, अडुळसा अशा अनेक औषधी वनस्पतींचे देखील वृक्षारोपण यावेळी करण्यात आले.

विध्यार्थ्यांना शालेय जीवनापासून पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी या हेतूने विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करण्यात आले. शाळेतील शंभर विद्यार्थ्यांनी एकूण ३०० झाडे लावली. यामध्ये चिंच, आंबा, कडुनिंब, पिंपळ अशा भारतीय वंशाची झाडे पर्यावरणासाठी कशी फायदेशीर आहेत, याची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.