chakan : सराफी दुकान फोडले; २८ लाखांचा ऐवज लंपास

पाच अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल, घटनास्थळी श्‍वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण

एमपीसी न्यूज -चाकणमधील एका सराफी दुकानाचे शटर उचकटून तब्बल २८ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना चाकण (ता. खेड) येथे शुक्रवारी (दि. १८) पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास घडली. शहराच्या मध्यभागात असलेल्या भांबुर्डेकर सराफी दुकानातील या घरफोडीप्रकरणी पाच अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेत रोख रकमेसह सोन्याची ठुशी, सोन्याची बोरमाळ, पैंजण, जोडवे, देवांच्या मुर्त्या, अंगठ्या, ब्रासलेट आदी महागडे दागिने असा एकुण २८ लाख १५ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. याबाबत भांबुर्डेकर सराफ दुकानच्या वतीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी एकुण पाच अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चाकण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुन्या पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण गावच्या हद्दीतील माणिक चौकाजवळ भांबुर्डेकर यांचे अद्ययावत असे सोन्या-चांदीचे दुकान आहे. शुक्रवारी (दि. १८) पहाटे पावणे चार वाजण्याच्या दरम्यान पाच अनोळखी इसमांनी भांबुर्डेकर यांचे सोन्या-चांदीचे दुकान फोडले. तत्पूर्वी त्यांनी दुकानाचे सायरन, दर्शनी भागात असलेले सीसीटीव्ही बंद केले. सबंधित तरुण हे २५ ते ३० वर्षे वयोगटातील असून, त्यांच्या अंगात जर्किन, डोक्यात कानटोपी, चेहरा झाकलेला, पायात बूट आणि हातात मौजे घातलेले असल्याचे एका सीसीटीव्हीमध्ये आलेल्या छबीत स्पष्ट झाले आहे.

भांबुर्डेकर सराफाच्या दुकानाचे लॉक तोडून शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर अत्यंत सफाईदारपणे कुणाला काहीही समजण्यापूर्वी चोरट्यांनी साडे चार लाख रुपये किमतीची सोन्याची ठुशी, वेगवेगळ्या आकाराचे आणि डिझाईनचे सोने, एक लाख पाच हजार रुपये किमतीची भरीव बोरमाळ, साडे सात लाख रुपये किमतीचे पैंजण, साडे चार लाख रुपये किमतीची जोडवी, तीन लाख रुपये किमतीच्या गणपती, काळूबाई, लक्ष्मी आदि देवदेवतांच्या दहा किलों वजनाच्या चांदीच्या मूर्ती, साठ हजार रुपये किमतीच्या अंगठ्या, दीड लाख रुपये किमतीचे ब्रेसलेट, चांदीच्या चैनी, दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे छल्ले आणि चांदीचा मेखला, तीन लाख तीस हजार रुपये किमतीचे तोडे, वाळे तसेच रोख दहा हजार रुपये असा एकुण २८ लाख १५ हजार रूपपे किमतीचा ऐवज घेवून पोबारा केला.

चाकण पोलिसांनी याप्रकरणी पाच ते सहा अज्ञात चोरट्यांवर भा.द.वि.कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या धाडसीचोरीमुळे चाकण शहर व परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. चोरी झालेल्या सराफी दुकानाच्या लगत अनेक सराफी दुकाने असून रात्रीच्या वेळी सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे या धाडसी चोर्रीने स्पष्ट झाले आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले की, चोरट्यांनी सीसीटीव्ही आणि सायरन बंद करून हा प्रकार केला आहे. एका सीसीटीव्हीमध्ये पाच असल्याचे दिसून येत आहे. घटनास्थळी श्‍वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. चोरट्यांनी शटर तोडण्याचे कटर आणि सर्व वस्तू जाताना नेल्याने श्वान पथक मग काढू शकले नाही. पोलिसांनी एक पथक तपासासाठी रवाना केले असून तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.