PCNTDA News : ‘भूखंड हस्तांतरणाच्या कामासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करा’, कैलास बारणे यांची मागणी

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त झाले आहे. त्यामुळे प्राधिकरणातील भाडे पट्टयाने दिलेल्या भूखंडाचे हस्तांतरण व इतर कामासाठी कक्ष निर्माण केला आहे. या कक्षात कर्मचा-यांची कमतरता असल्याने काम अतिशय संथगतीने सुरु आहे. तिथे अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करुन द्यावेत तसेच हा कक्ष निगडीतील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय येथे हलविण्यात यावा, अशी मागणी महापालिकेतील अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी राज्य सरकारकडे केली.

याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महेश पाठक यांना निवेदन दिले. त्यात गटनेते बारणे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त  करण्यात आले आहे. भाडेपट्याने वाटप केलेले भूखंड तसेच अतिक्रमित भूखंड या दोन्ही प्रकारच्या भूखंडाचा ताबा तसेच मालकी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे निहित करण्यात आली. भाडेपट्टा झालेल्या भूखंडाचे हस्तांतरण, वारस नोंद करणे, भूखंड गहाण ठेवून कर्जासाठी ना -हरकत दाखला देणे, कुटुंबातील व्यक्तींना समाविष्ट करणे इत्यादी कामे महापालिकेला करावी लागणार आहेत.

भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या भूखंडाची संख्या सुमारे पाच हजार आहे. महापालिकेने ही कामे करण्याकरीता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आकुर्डी येथे एका खोलीत कक्ष निर्माण केला आहे. या कक्षात केवळ तीन लिपिक काम करीत आहेत. जुलै ते नोव्हेंबर 2021 पर्यंत सुमारे 200 प्रलंबित प्रकरणांपैकी फक्त 15 प्रकरणात कार्यवाही करण्यात आली आहे. संथगतीमुळे  नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.  कर्मचारी संख्येमुळे नागरिकांची कामे होत नाहीत. आपण यात जातीने लक्ष घालावे. या कामासाठी कमीत कमी 10 लिपिकाची नेमणूक करण्याचे महापालिकेला निर्देश द्यावेत.

या कामासाठी निर्माण केलेला कक्ष हा तत्कालीन पिंपरी -चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सेक्टर 24  मधील निगडी चौकातील जुन्या कार्यालयाचे ठिकाणी हलवण्यात यावा. आजमितीस या ठिकाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय कार्यान्वित आहे. सेक्टर 24 मधील इमारत ही पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या मालकीची आहे. त्याची मालकी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे वर्ग करण्यात यावी. जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयात जाणे-येण्यासाठी PMPML बस स्टॉप व मेट्रो स्टेशन सोयीचे होईल, असे गटनेते बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.