Akurdi News: भाजपने भ्रष्टाचाराचा कळस गाठला, आमदारही भ्रष्टाचाराला जबाबदार – कैलास कदम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मागील साडेचार वर्षात भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. करदात्यांची लूट चालविली. महापालिकेतील भ्रष्टाचाराला भाजपचे दोनही आमदार जबाबदार आहेत. त्यांच्या आर्शीवार्दाने प्रशासकीय अधिका-यांना धरुन महापालिकेत भ्रष्टाचार चालला असल्याचा आरोप करत याविरोधात अधिक तीव्रतेने आवाज उठविणार असल्याचे काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष कैलास कदम यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी कैलास कदम यांची नुकतीच निवड झाली. त्यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका सांगितली. आकुर्डीत झालेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे, माजी महापौर कविचंद भाट, माजी महिला प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, माजी नगरसेविका निगार बारस्कर, सद्गरु कदम, एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, युवकचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अशोक मोरे, सेवादलाचे संग्राम तावडे, सज्जी वर्की, के.एच.हरिनारायण, श्याम आगरवाल, वसीम इनामदार, सुंदर कांबळे, विरेंद्र गायकवाड, उमेश खंदारे आदी उपस्थित होते.

”पिंपरी-चिंचवड शहराच्या उभारणीत काँग्रेसचा मोठा वाटा आहे. काँग्रेसच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे झाली असल्याचे” सांगत शहराध्यक्ष कदम म्हणाले, ”भाजप राजवटीत पाणी, कचरा या मुलभूत समस्या सुटल्या नाहीत. विकास कामाच्या नावाने बोंबाबोंब आहे. भाजपने खेळखंडोबा केला आहे. महापालिकेत केवळ भ्रष्ट कारभार चालला आहे. महापालिकेत लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. त्याविरोधात काँग्रेस आणखी तीव्रतेने आवाज उठिवणार आहे”.

”काँग्रेसमध्ये कोणतेही गट-तट नाहीत. काँग्रेस हाच एकमेव गट आहे. कोणीही नाराज नाही. शहरात सर्वत्र काँग्रेसची ताकद आहे. फक्त पक्षाला मानणा-या लोकांपर्यंत पोहचण्याचे काम आम्हाला करायचे आहे. आगामी महापालिका निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार देण्याची काँग्रेसची तयारी आहे. स्वबळावर की महाविकास आघाडीकरुन लढायचे याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्टी घेतील. तो निर्णय आम्हाला मान्य असेल. महापालिकेत काँग्रेसच्या तिकीटावर जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नव्या, जुन्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. सर्वांना विश्वासात घेऊन लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे”ही कदम यांनी सांगितले.

पृथ्वीराज साठे म्हणाले, ”महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून लूट केली जात आहे. दिवसाढवळ्या करदात्यांच्या पैशांवर दरोडा टाकला जात आहे. करदात्यांच्या पैशांचा दुरउपयोग केला जात आहे. विशिष्ट लोकांकडून अतिशय चुकीच्या पद्धतीने महापालिकेत कारभार चालविला जात आहे”.

नवनियुक्त शहराध्यक्ष कदम यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याबाबत विचारले असता साठे म्हणाले, ”काँग्रेसने अभ्यास करुन, माहिती घेऊन त्यांची नियुक्ती केली. त्यामुळेच नियुक्तीला विलंब झाला. एखादा निर्णय सर्वांना पटतो असे नाही. सर्वांशी बोलून मार्ग काढला जाईल”, असे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.