Talegaon News : कलापिनीचे संस्थापक सदस्य भरत कुमार शुक्ल यांचे दु:खद निधन

एमपीसी न्यूज : कलापिनीचे संस्थापक सदस्य श्री भरत कुमार शुक्ल  (वय ७०) यांचे काल दिनांक १६ एप्रिल २०२१ रोजी बदलापुर येथे कोरोनाने दु:खद निधन झाले.

भरत कुमार १९७५ च्या सुमारास पुण्यातील लॉ कॉलेज मधील लायब्ररीयन च्या नौकरी निमित्त धरणगाव (खानदेश) येथून आले व तळेगावकर झाले होते. हौशी नाट्यमंडळाच्या ‘सासरे बुवा जरा जपून’ व ‘घेतलं शिंगावर या नाटकातून त्यांनी तळेगावच्या सांस्कृतिक क्षेत्रात प्रवेश केला. १९७८ सालच्या कामगार कल्याण मंडळाच्या नाट्य स्पर्धेत त्यांची भूमिका असलेल्या सासरे बुवा जरा जपून या नाटकाला अभिनय,दिग्दर्शन व निर्मिती पुरस्कार मिळाले हे नाटक बसविण्यात श्री भरत कुमार यांचाच पुढाकार होता.

भरत कुमार शुक्ल यांचा कलापिनीच्या स्थापनेतही महत्वाचा सहभाग होता कलापिनीचे ते पहिले सचिव होते. सुखी संसार, आम्ही सौजन्यात आहोत, या एकांकिकांच्या सादरीकरणात त्यांचा महत्वाचा वाटा होता

कलापिनीच्या एकांकिका,परिसंवाद, नाट्यवाचन, संगीत स्पर्धा,प्र कट मुलाखती या विविध उपक्रमांचा पाया त्यांनीच घातला. १९७८ला डॉ.शं.वा.परांजपे यांच्या निधनानंतर श्री.भारतकुमार यांनी पुढाकार घेऊन, दिग्दर्शन करून आसावरी हे नाटक उभे केले व या नाटकाद्वारे २००० रु.चा निधी उभा केला व त्यातूनच  कै.डॉ.शं.वा. परांजपे बालनाट्य स्पर्धांसाठी करंडक निर्माण झाले व स्पर्धा सुरु झाल्या.

_MPC_DIR_MPU_II

पुढे भिवंडी कॉलेज मधील नौकरी निमित्ताने बदलापूरला गेले पण कालापिनिशी कायमच प्रेम संपर्क राहिला. तळेगावी जुळलेल्या संपर्कातून त्यांनी मधुकर टिल्लू, विठ्ठल काटे अशा अनेकांचे कार्यक्रम घडवून आणले. बदलापूर येथेही त्यांनी सांस्कृतिक ,सामाजिक जीवनात हिरीरीने भाग घेऊन स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. लायब्ररी, व्याख्यानमाला,नाटके यांचे उत्तम आयोजन केले. ओलीसुकी नाट्य वाचन ,गुलजार एक कलाप्रवास हे कलापिनीचे कार्य्कार्म बदलापूर येथे आयोजित करून त्यांनी कलापिनीला बदलापूरचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

निवृत्तीनंतर तळेगाव ला परत येऊन हास्य योग, काव्यमंच सारख्या उपक्रमात सक्रीय होऊन जेष्ठांसाठी विनोद सांगा स्पर्धा, नाट्यवाचन, नाटिका, परिसंवाद अशा विविध उपक्रमांची रेलचेल सुरु केली. जेष्ठांना घेऊन  नाट्यवाचन स्पर्धेत युवकांच्या बरोबरीने पारितोषिके मिळवली. नुकतीच त्यांनी कलापिनीच्या नवीन रंगमंच प्रकल्पाला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रु. ची देणगी देऊन सर्व सामान्य माणसाच्या सामर्थ्याचे व इच्छा शक्तीचे दर्शन घडविले. ते तळेगावच्या ब्राम्हण सर्वसेवा संघाचे विद्य्मान कार्यकारिणी सदस्य होते.

एक उत्कृष्ट कलाकर, उत्तम निवेदक, मृदू भाषाशैली, सतत हसतमुख व उत्साही प्रसन्न व्यक्तिमत्व, सर्वांना हवाहवासा वाटणारा सालस स्वछ मनाचा मोठा माणूस  आपल्या सर्वांना सोडून अनंताच्या प्रवासास निघून गेला.

त्यांचे अचानक असे जाणे हे सर्वांनाच धक्कादायक आहे. त्यांची उणीव कधीच भरून येऊ शकणार नाही. त्यांचा मुलगा अंकुर उत्तम गायक आहे व कलापिनीत सक्रीय आहे त्यांची पत्नी रेखा शुक्ल यांनी भरत कुमार यांना  कायमच सुजाण आणि भक्कम साथ केली.

शुक्ल कुटुंबियांना झालेल्या दु:खात कलापिनी परिवार सहभागी आहे. ईश्वर श्री. भरत कुमार यांना चिरशांती देवो हीच प्रार्थना.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.