Kalewadi: नळजोडांना पंप लावून पाणी घेणा-यांवर कारवाई; 17 विद्युत पंप जप्त

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नळजोडांना थेट विद्युत पंप लावून बेकायदेशीररीत्या पंपाने पाणी घेणा-या 17 जणांचे पंप जप्त करण्यात आले आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या भरारी पथकाने काळेवाडीतील पवनानगर परिसरात आज (सोमवारी) ही कारवाई केली.

पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. आजमितीला धरणात 18 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेने पाणीकपात देखील लागू केली आहे. शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाने ओढ दिल्यास पाणी टंचाई सोसावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

  • नागरिकांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय केला जात आहे. बेसुमार पाणी वापरले जाते. महापालिकेच्या नळजोडांना थेटपणे पंप लावून पाणी खेचले जाते. काळेवाडीतील नळजोडांना थेट विद्युत पंप लावून बेकायदेशीररीत्या पंपाने पाणी खेचणा-या 17 विद्युत ग्राहकांवर कारवाई करत पंप जप्त करण्यात आले आहेत.

नागरिकांनी नळजोडाद्वारे येणारे पाणी प्रथमत: जमिनीखालील पाण्याच्या टाकीमध्ये घ्यावे. या टाकीतून पंपाने पाणी इमारतीवरील टाकीमध्ये घ्यावे. ज्या नागरिकांना जमिनीखालील टाकी नाही. त्यांनी आवश्यक क्षमतेची जमिनीखालील पाण्याची टाकी बांधावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. त्याचबरोबर नळजोडांना थेट विद्युत पंप जोडून पाणी घेतल्यास विद्युत पंप कायमस्वरुपी जप्त करण्याचा इशारा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.