Kalewadi : अखेर मूळ घरमालक, सून यांच्यासह ‘त्या’ एजंट विरोधात गुन्हा दाखल 

कोरोना योद्धा नर्सने आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर पोलीस यंत्रणेने दिला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – घर देतो म्हणून खरेदी खत करूनही लाखो रुपयांची फसणवूक केल्याच्या प्रकरणी दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यास पोलीस व्यवस्था टाळाटाळ करीत असल्याने हतबल होऊन आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या कोरोना योद्धा परिचारिका निशिगंधा अमोलिक यांना अखेर दिलासा मिळाला असून त्या घर मालक, सून यांच्यासह एजंट विरोधात वाकड पोलीस ठाण्यात रविवारी (दि.5) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलिसांनी या प्रकरणी वसुंधरा वसंत भोसले (रा. साई प्राईड, ढेंगळे कॉर्नर, मेन रोड, विजयनगर, काळेवाडी), डेझी नरेंद्र भोसले (रा. स. नं. 100/02, गणेश कॉलनी, विजयनगर, काळेवाडी) व डॉ. तेजराज ढेंगळे (रा. साई प्राईड, ढेंगळे कॉर्नर, मेन रोड, विजयनगर, श्री हॉस्पिटलजवळ, काळेवाडी) यांच्या विरोधात कलम 406, 420, 448, 34 खाली फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे? 
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात परिचारिका म्हणून काम  करणार्या निशिगंधा अमोलिक यांनी वसुंधरा भोसले यांच्या मालकीचे काळेवाडी येथील पावणेदोन गुंठे क्षेत्रफळ असलेले बैठे घर खरेदीखत करून 56 लाख रूपयांना खरेदी केले.  अमोलिक यांनी कर्ज काढून ठरलेली रक्कम वसुंधरा भोसले यांच्या खात्यावर जमा केली. या व्यवहारात मध्यस्ती म्हणून एजंट डॉ. तेजस ढेंगळे यांनी काम पाहिले.
घर घेतेवेळी डॉ. ढेंगळे यांनी वसुंधरा भोसले यांच्या कुटुंबात केवळ त्यांच्या घटस्फोटीत  मुलगा हा एकमेव सदस्य असल्याचे सांगितले.  घटस्फोट झाल्याने सून त्यांच्याबरोबर राहात नाही. त्याचबरोबर आजींना घराची किंमत मिळाल्यानंतर त्यांची राहण्याची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना एक महिना याच घरात राहू द्यावे, त्याबदल्यात मी 25 हजार भाडे देण्याची हमी देतो, असे डॉ. ढेंगळे यांनी तोंडी सांगितले होते. महिन्यानंतर डॉ. ढेंगळे यांनी त्यांच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये भोसले आजी व त्यांच्या मुलाला नेऊन ठेवले आणि त्यांची घटस्फोटीत सून डेझी नरेंद्र भोसले हिला अमोलिक यांनी  घेतलेल्या घरात आणून ठेवले.
काहीही कल्पना न देता, त्यांच्या सुनेला घरात आणून ठेवले. याबाबत जाब विचारला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. सूनबाई डेझी नरेंद्र भोसले यांच्याकडे ताबा मागण्यास गेले असता, तिने अमोलिक यांच्याकडे 25 लाख रुपये मागितले, अन्यथा मी ताबा देणार नाही, असे सांगितले.
गेले एक वर्ष डेझी नरेंद्र भोसले या घरामध्ये अनधिकृतपणे राहात आहे. अमोलिक गृहवित्त संस्थेचा दरमहा 40 हजार रुपयांचा हप्ता भरतात. मात्र, अजूनपर्यंत घराचा ताबा मिळाला नसल्याने हतबल झालेल्या अमोलिक यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
याबाबत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई व गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी निवेदन देखील दिले होते. गृहमंत्री अनिल देशमुख, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार गीतांजली गायकवाड यांनाही त्यांनी साकडे घातले होते.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी या प्रकरणाची गंभीर घेऊन तातडीने फिर्याद नोंदवून घेण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक सतीश माने पुढील तपास करीत आहेत.

‘एमपीसी न्यूज’ने सर्वप्रथम अन्यायाला वाचा फोडली
अमोलिक यांच्यावर झालेल्या अन्यायाला सर्वप्रथम ‘एमपीसी न्यूज’ने वाचा फोडली होती. याबाबत अमोलिक यांच्याशी चर्चा करून व सविस्तर माहिती घेऊन 30 जून रोजी ‘एमपीसी न्यूज’ने बातमी प्रसारित केली होती. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अखेर गुन्हा दाखल केला आहे.
प्रदीप नाईक यांच्या पाठपुराव्याला यश 
माहिती अधिकार कार्यकर्ते व महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप नाईक यांनी या प्रकरणी पुढाकार घेत अमोलिक यांना न्याय मिळवा यासाठी पाठपुरावा केला. तसेच त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.