Kalewadi News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित संकल्प चित्र साकारणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत काळेवाडी एम. एम. स्कूल चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित संकल्प चित्र साकारण्यात येणार आहे. तसेच सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी किमया यांची वास्तुविशारद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना प्रकल्प किमतीच्या 1.98 टक्के शुल्क देण्यात येणार आहे.

महापालिका स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी दरम्यानचा रस्ता विकसित करण्यात आला आहे. या रस्त्यावर काळेवाडी येथील एम. एम. स्कूल चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित संकल्प चित्र आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या सन 2020-21 च्या मूळ अर्थसंकल्पात विशेष योजना या लेखा शिर्षाअंतर्गत 6 लाख 92 हजार रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. 4 जून 2020 रोजीच्या महापालिका सभेत या कामास 5 कोटी रुपये इतकी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित संकल्प चित्र व सुशोभीकरण करण्यासाठी वास्तुविशारदाची नेमणूक करण्यासाठी महापालिकेकडून दर मागविण्यात आले होते. त्यामध्ये तीन वास्तुविशारदांनी दरपत्रक सादर केले. त्यात किमया यांनी 1.98 टक्के इतका लघुत्तम दर सादर केला. या परिसराचे आराखडे तयार करणे, सुशोभीकरणाच्या बाबींचे दरपृथवकरण करणे, त्यानुसार, पूर्वगणकपत्रक करणे व निविदा मागविणे आदी निविदापूर्व, निविदापश्चात कामे करावी लागणार आहेत.

राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे. प्रकल्प अहवाल व्यावस्थापन सल्लागार शुल्क आणि त्यांच्या प्रदानाबाबत मार्गदर्शक सूचनांनुसार टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे शुल्क देण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रकल्पाचे प्रशासकीय मान्यतेचे आदेश जारी झाल्यानंतर 0.48 टक्के, कामाचे कार्यादिश दिल्यानंतर 0.16 टक्के, प्रकल्पाचे 25 टक्के काम पूर्ण झाल्यावर 0.27 टक्के, 50 टक्के काम पूर्ण झाल्यावर 0.27 टक्के, 75 टक्के काम पूर्ण झाल्यावर 0.40 टक्के आणि 100 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर 0.40 टक्के असे 1.98 टक्के शुल्क देण्यात येणार आहे. याबाबतच्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.