Kalewadi news: संस्थेच्या बनावट लेटरपॅडवर मच्छिंद्र तापकीर यांच्याकडून पत्रव्यवहार

शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाचे सचिव मल्हारी तापकीर यांचा आरोप

एमपीसी न्यूज – शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ, काळेवाडी या संस्थेच्या मालमत्तेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये असा मनाई आदेश धर्मादाय आयुक्तांनी या संस्थेचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर यांच्या विरुद्ध दिला असल्याचे संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर यांनी सांगितले. संस्थेच्या कामकाजाबाबत नियमानुसार बदल अहवाल न्यायालयात दाखल करण्यात आलेला आहे. कोणताही हक्क अथवा अधिकार नसताना संस्थेच्या बनावट लेटरपॅडवर मच्छिंद्र तापकीर हे पत्र व्यवहार करीत आहे. याबाबत सक्षम प्राधिकारी यांच्याकडे संस्थेने तक्रारी दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.

याबाबत मल्हारी तापकीर यांनी म्हटले आहे की, शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 9 जून 2019 रोजी संपन्न झाली.

वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन संचालक मंडळ निवडले आहे. संस्थेचे अध्यक्ष म्हणून चंद्रकात तापकीर, सचिवपदी मल्हारी तापकीर व इतर पदाधिकारी यांची कार्यकारिणी निवड करण्यात आलेली आहे.

संस्थेच्या वतीने कै. श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर,श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय, एल.बी.टी. इंग्लिश मीडियम स्कूल,तापकीरनगर काळेवाडी, पुणे व श्री भैरवनाथ माध्यामिक विद्यालय, मु. पो. ओझर्डे, ता. मावळ जि.पुणे या शाळा चालविण्यात येतात.

संस्थेचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर हे नवीन संचालक मंडळाला कामकाजात अडथळे आणण्याचा व संस्थेच्या मालमत्तेला हानी पोहचवण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर, संचालक शशिकांत तापकीर व महेंद्र बामगुडे यांनी मच्छिंद्र तापकीर यांना 41 ई कलमानुसार मनाई करावी असा विनंती अर्ज न्यायालयात दाखल केला.

या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही पक्षाचे म्हणणे एकून 15 सप्टेंबर 2020 रोजी मल्हारी तापकीर यांचा अर्ज मंजूर करून मच्छिंद्र तापकीर यांना मनाई केलेली आहे, असे मल्हारी तापकीर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.