Kalewadi News: पालिकेच्या शिक्षणाधिकारी जोत्स्ना शिंदे यांच्याकडून गैरकारभार – मच्छिंद्र तापकीर

एमपीसी न्यूज – काळेवाडीतील भाऊसाहेब तापकीर शाळेतील वादातील प्रकरणात पिंपरी पालिकेच्या शिक्षणाधिकारी जोत्स्ना शिंदे यांनी गैरकारभार केल्याचा आरोप करत संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर यांनी शिंदे यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. 

गुन्हे शाखेने याप्रकरणी शिक्षण आयुक्तांकडे  चौकशी अहवाल मागविला आहे असल्याचे तापकीर यांनी सांगितले असून  सत्याचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याबाबत मच्छिंद्र तापकीर म्हणाले की, संस्था अध्यक्ष व शिक्षण खात्याच्या आदेशानंतरही प्रभारी मुख्याध्यापिका जयश्री पवार यांनी शाळेतील आठ कर्मचाऱ्यांना शाळेत रुजू करून घेतले नाही. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर पवार यांनी परस्पर या पदाची जबाबदारी उपशिक्षिका उल्का जगदाळे यांना दिली. बेकायदेशीर पदभार स्वीकारल्याबद्दल जगदाळे यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करत त्यांनाही बडतर्फ करण्यात आले.

दरम्यान पवार आणि जगदाळे यांनी शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे यांच्याशी संगनमत करून बडतर्फ असतानाही वेतनाचे अधिकार प्राप्त करून घेतले असल्याची तक्रार तापकीर यांनी शिक्षण विभाग व आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती.

त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने सदर प्रकरण शिक्षण आयुक्तांकडे वर्ग केला आहे.  यासंदर्भात शिक्षण आयुक्तांनी निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी तापकीर यांनी केली आहे. तसेच जोत्स्ना शिंदे यांच्यावर योग्य कारवाई न झाल्यास मोठे जनआंदोलन करण्यात येईल. वेळप्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येईल, असा इशाराही तापकीर यांनी यावेळी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.