Kalewadi News: बेकायदेशीर झोपड्यांवर 15 दिवसात कारवाई करा, अन्यथा आंदोलन; रिदम हाऊसिंग सोसायटीचा इशारा

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) वाकड (Kalewadi News) येथील सर्व्हे क्रमांक 210, 208, 209 येथील मोकळ्या भूखंडावर वसलेल्या बेकायदेशीर झोपडीधारकांचा सोसायटीधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या झोपड्यांवर कारवाईची मागणी करुन पीएमआरडीएकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत येत्या 15 दिवसात या बेकायदेशीर झोपड्यांवर कारवाई करावी. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा वाकड, काळेवाडी फाटा येथील रिदम हाऊसिंग सोसायटीने दिला आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडेही तक्रार करण्यात येणार आहे.

याबाबत सोसायटीचे सचिव अभिजित गरड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  सोसायटीच्या बाजूला पीएमआरडीएचा मोकळा भूखंड आहे. त्यावर बेकायदेशीरपणे झोपड्या वसल्या आहेत. झोपड्यामध्ये स्वच्छता राखली जात नाही. सर्व कचरा नाल्यामध्ये आणि उघड्यावर टाकला जातो. त्यामुळे शेजारच्या रहिवाशांच्या आरोग्याच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. हे झोपडीधारक डुकरांची पैदासही करतात. त्यांच्या कृत्याकडे दुर्लक्ष केले जाते. लक्ष दिले जात नाही. हा परिसर गांजा विक्रीसाठी एक आसरा बनला आहे. त्यामुळे हा परिसर महिला, मुलांसाठी आणि संपूर्ण परिसरासाठी अतिशय असुरक्षित बनला आहे.

याबाबत सप्टेंबर 2022 मध्ये पीएमआरडीए, महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली. पीएमआरडीए प्रशासनाच्या निष्क्रियेतमुळे आणि उदासीनतेमुळे अनेक वर्षांचा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील सततची दुर्गंधीमुळे  गणेशोत्सव 2022 मध्ये सोसायटीतील रहिवाशांच्या आरोग्य, श्वास घेण्याच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे सोसायटीतील 200 सभासदांनी पीएमएआरडीएच्या आजूबाजूच्या मोकळ्या जमिनींमुळे उद्भवणा-या समस्यांबाबत पत्र देत कारवाई मागणी केली.

महापालिकेने बेकायदेशीर कचरा डंपिंग थांबवावे. अवैध झोपड्यांवर कारवाई करावी. अवैध डुक्कर पालनावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद देत कचरा मोकळा टाकणे बंद केले. डुकरे हटविण्यास मदत केली. पीएमआरडीएने बेकायदेशी झोपड्यांवर कारवाई करण्याचा अहवाल दिला. त्यानंतर पीएमआरडीएच्या वरिष्ठ, अतिक्रमण विभागाच्या अधिका-यांची भेट घेतली.  22 सप्टेंबर 2022 ते 17 जानेवारी 2023 या दरम्यान सातत्याने पीएमआरडीएच्या अधिका-यांची भेट घेतली. वेळोवेळी कारवाई टाळल्यानंतर अखेरीस पीएमआरडीएने 11 जानेवारी रोजी 8 दिवसात झोपडीधारकांना झोपड्या रिकाम्या करण्याचे सांगितले.

Kasarsai : कासारसाई येथे घरफोडीत करून एक लाखाचा ऐवज लंपास

परंतु, बेकायदेशीर झोपड्यांवरील कारवाईविरोधात काही संघटनांनी 16 जानेवारी रोजी पीएमआरडीए इमारतीवर आंदोलन केले. त्यामुळे पुन्हा सोसायटीतील पदाधिका-यांनी 17 जानेवारी रोजी पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांची भेट घेतली. बेकायदेशीर (Kalewadi News) झोपड्यांवरील कारवाईला होत असलेल्या दिरंगाईबद्दल चिंता व्यक्त केली. महिला, मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. वसाहतीतील मोकळ्या जागेत व बेकायदेशीर झोपड्यांमध्ये डुकरांचे अड्डे, उघड्यावर मद्यपान करणे, टायर जाळणे, गांजा रॅकेट आदींचा छडा लावून झोपड्यांवर कारवाईची मागणी केली. येत्या 15 दिवसात या बेकायदेशीर झोपड्यांवर कारवाई करावी. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.