Kalewadi : …अन्यथा प्रभागातील कचरा महापालिका इमारतीत टाकणार -नितीन बनसोडे

एमपीसी न्यूज – काळेवाडीतील भारतमाता चौक ते तापकीर मळा चौक दरम्यानच्या रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून तेथील कचऱ्याची वेळेत विल्हेवाट लावली जात नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जर तात्काळ हा कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर, प्रभागातील सर्व कचरा गोळा करून महापालिकेत टाकण्यात येईल, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे शहराध्यक्ष नितीन बनसोडे यांनी दिला आहे.

काळेवाडीतील सर्वात वर्दळीचे ठिकाण असलेल्या भारतमाता चौकात भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते आणि लहान-मोठ्या हातगाडीधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी उरलेला, सडलेला भाजीपाला, फळे तसेच दुकानातील कचरा मुख्य रस्त्यावरच टाकला जातो. स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणात याठिकाणी कचरा टाकतात. त्यामुळे या ठिकाणी जागोजागी साचलेल्या कचऱ्याचे ढीग दिसून येतात.

_MPC_DIR_MPU_II
  • यासंदर्भात बोलताना शहराध्यक्ष बनसोडे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून काळेवाडीत कचऱ्याचा प्रश्न मोठा गंभीर प्रश्न आहे. भारतमाता चौक आणि तापकीर मळा चौक हे दोन्ही मोठ्या रहदारीचे आणि वर्दळीचे ठिकाण असून या मार्गावरून हजारो नागरिक व लहान विद्यार्थी दररोज ये-जा करतात. रस्त्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे लहान मुले व नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

दुर्दैवाने या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभागाची भूमिका डोळेझाकपणाची असून या समस्येला तेच कारणीभूत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर काळेवाडीतील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर प्रभागातील कचरा गोळा करून महापालिका इमारतीत टाकण्यात येईल, असा इशारा नितीन बनसोडे यांनी यावेळी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.