BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : कलापिनीच्या युवा कलाकारांनी मारली बाजी; मानाचा मौनांतर करंडक पटकावला 

एमपीसी  न्यूज – वाईड विंग्स प्रस्तुत मौनांतर २०१९ या मूकनाट्य स्पर्धेत पुण्या-मुंबईतील एकूण २० संघांमधून तळेगाव दाभाडे येथील कलापिनी संस्थेच्या शतपावली या मूकनाट्याने प्रथम क्रमांक पटकावला. दि. १३ जुलै २०१९ रोजी पुणे येथील भरतनाट्य मंदिरात (दि. १३ जुलै) पुणे विद्यापीठाच्या नाट्य शास्त्रविभागाचे प्रमुख ऑफ डॉ. प्रवीण भोळे व सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, नाट्य सिने अभिनेता आणि मुंबई विद्यापीठाच्या अॅकेडमी ऑफ थिएटर आर्टस या नाट्यशास्त्र विभागाचे संचालक योगेश सोमण यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.

आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नये म्हणून तिच्यापासून वास्तव लपवण्याची एका आईची कसरत आणि त्यात आलेली हतबलता आणि स्वतःच्या विश्वात रमलेल्या निरागस मुलीवर अचानक झालेले वास्तवाचे आघात याची गोष्ट शतपावली नाटकातून उलगडत जाते.

या नाटकाचे सकस लेखन कलापिनीचा युवा कलाकार खगेश जोशी याने केले होते. त्याकरिता त्याला मौनांतर २०१९ उत्कृष्ट कथा पुरस्काराने गौरवण्यात आले. चेतन पंडित याने नेटके दिग्दर्शन केले होते. या नाटकातील आईची भूमिका सायली रौंधळ हिने अप्रतिमरित्या साकारली तर लहान मुलीच्या प्रमुख भूमिकेतील मुक्ता भावसार हीने केलेल्या अप्रतिम निरागस अभिनयाला प्रेक्षकांची उत्तम दाद आणि मौनांतर २०१९ चा उत्कृष्ट अभिनयाचा प्रथम पुरस्कार मिळाला. या प्रमुख कलाकारांना प्रतिक मेहता, हरीश पाटील, वेदांग महाजन, सिद्धेश घंगाळे, जितेंद्र पटेल, प्रणोती पंचवाघ, तेजस्विनी गांधी, विशाखा बिके, मानसी वाडी, विनायक काळे, हेमंत आपटे, योगेश वैद्य, प्रसाद वायकर या सहकलाकारांची उत्तम साथ लाभली.

ऱ्हितिक पाटील व विराज सवाई यांनी केलेली साजेसी प्रकाशयोजना देखणी होती. प्रणव केसकर व आदित्य धामणकर यांनी चपखल पार्श्वसंगीत केले होते. चैतन्य जोशी याने नेपथ्यातून थोडक्यात व परिणामकारक दृश्य निर्माण केले व त्यासाठी अनन्या गोसावी, शार्दुल गद्रे, वादिराज लिमये, स्वच्छंद गंधाके, आदिती आपटे यांचे सहाय्य लाभले. रंगभूषेची जबाबदारी अनुजा झेंड हिने तर वेशभूषेची जबाबदारी विशाखा बेके हिने उत्तमरित्या पार पाडली.

संपूर्ण नाटकाचे व्यवस्थापन  प्रतिक मेहता याने केले होते तर संपूर्ण संघाला डॉ. अनंत परांजपे, श्रीधर कुलकर्णी, विनायक भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले. सब कुछ युवा असलेल्या या कलापिनीच्या सादरी करणाने उत्तम यश संपादन करून सुवर्णमहोत्सवाकडे होणारी वाटचाल आश्वासक केली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.