Book Launching : दत्तक प्रक्रियेविषयी विस्तृत माहिती देणारे कल्याणी सरदेसाई यांचे ‘चाईल्ड ऑफ माय हार्ट’ 

एमपीसी न्यूज – पत्रकार कल्याणी सरदेसाई यांनी ‘चाईल्ड ऑफ माय हार्ट’ या पुस्तकाच्या माध्यमातून मुल दत्तक घेण्याच्या संबंधित सर्व विषयांचा सखोल धांडोळा घेतला आहे. किचकट वाटणा-या या प्रकियेविषयी सहज आणि सोप्या भाषेत त्यांनी हा विषय समजावून सांगायचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात मुलं दत्तक घेतलेल्या पालकांचे युवा दत्तक मुलांच्या सखोल मुलाखतीचा समावेश केला आहे. दत्तक मुलांशी कसं वागावं याबाबत माहिती देणारा मानसशास्त्रीय सल्ला यामध्ये देण्यात आला आहे. आणि भारतीय दत्तक प्रक्रिया कशी चालते याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

गेली वीस वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकार कल्याणी सरदेसाई यांच्या ‘चाईल्ड ऑफ माय हार्ट’ या पुस्तकाचे आज (दि.9) जागतिक दत्तक दिनाच्या निमित्ताने प्रकाशन होत आहे. यानिमित्ताने ‘एमपीसी न्यूज’ने त्यांच्याशी संवाद साधला व पुस्तकाविषयी माहिती जाणून घेतली.

सरदेसाई म्हणाल्या, भारत आणि भारताबाहेर बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 याअंतर्गत सर्व दत्तक प्रक्रिया चालते. भारतात मुल दत्तक घेण्यासाठी एकच केंद्रीय पद्धत आहे ज्याला ‘केंद्रीकृत दत्तक संसाधन प्राधिकरण’ (CARA) असं म्हणतात. महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत हा विभाग येतो. दत्तक प्रक्रिया मुळातच किचकट आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. माझा पुस्तक लिहिण्याचा उद्देश मुलं दत्तक घेण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करणं एवढाच नाही तर, त्यासंबंधीत सर्व विषयांची योग्य आणि विस्तृत माहिती मिळावी हा आहे. मुलं दत्तक घेतले म्हणजे आपण समाजसेवा अथवा परोपकार केला असं अजिबात होत नाही. मुलांबाबत आपल्या मनात किती अस्था व प्रेम आहे हे जास्त महत्त्वाचं असतं असं सरदेसाई म्हणाल्या.

 

पुस्तकाविषयी माहिती देताना त्या म्हणाल्या, ‘चाईल्ड ऑफ माय हार्ट’ या पुस्तकाचे चार विभागांत वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या विभागात मुलं दत्तक घेतलेल्या पालकांच्या व लहानपणी दत्तक घेतलेल्या युवा मुलांच्या मुलाखती आहेत. अशा एकूण 30 मुलाखत यामध्ये आहेत. दुस-या विभागात मुल दत्तक घेतल्यानंतर त्यांच्याशी कसं वागावं, त्यांच्या मानसिकतेची काळजी कशी घ्यावी आणि दत्तक या प्रक्रियेशी कसं जुळवून घ्यावं याबाबत बाल मानसशास्त्रज्ञ व समाज सेवक यांनी मार्गदर्शन केले आहे. दत्तक या प्रक्रियेकडे सिनेमा कसं पाहतो. बाॅलीवूड, हाॅलीवूड यासह भारतीय पौराणिक कथांमध्ये ती कशी दाखवण्यात आली आहे याबाबत तिसऱ्या विभागात विवेचन करण्यात आले आहे.

जगात काही प्रसिद्ध आणि यशस्वी व्यक्तीमत्व होऊन गेली पण त्यांना सुद्धा लहानपणी दत्तक घेण्यात आलं होतं (उदा. राजेश खन्ना, नेल्सन मंडेला, बिल क्लिंटन) अशा काही महान व्यक्तीमत्वाविषयी यामध्ये माहिती देण्यात आली आहे. चौथ्या आणि अंतिम विभागात मुलं दत्तक घेण्याच्या कायदेशीर प्रक्रियेबाबत (भारतीय आणि आंतरराष्ट्रीय) सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अर्ज कसा आणि कुठे करावा, त्याचे नियम काय आहेत याबाबत सविस्तर माहिती चौथ्या विभागात देण्यात आली आहे. याशिवाय मानवी तस्करी, केंद्रीय दत्तक पद्धतीची गरज, मुलं दत्तक घेतल्यानंतर पालकांना प्रसूती रजा या विषयी देखील माहिती देण्यात आली आहे.

देशातील प्रत्येक मुलं आपण दत्तक घेऊ शकतो असं नाही दत्तक घेण्यासाठी मुलं ‘लिगली फ्री’ म्हणजे कायदेशीररीत्या दत्तक घेण्यास पात्र असणं आवश्यक आहे. केंद्रीय पद्धतीमुळे दत्तक प्रक्रियेला दोन वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो. यामध्ये मुलं दत्तक घेणा-या पालकांच्या सर्वच गोष्टींची सखोल चौकशी केली जाते. पुस्तकात या प्रक्रियेचे फायदे व तोटे या दोन्हीविषयी सविस्तर विवेचन करण्यात आले आहे.

माझ्या साठी हे पुस्तक एक वेगळा प्रवास आहे. बाल हक्कांवर लिखाण केलेली एक पत्रकार ते एक दत्तक पालक म्हणून माझ्यासाठी हा अनुभव फार समृद्ध करणारा आहे. आज (सोमवार, दि.9) जागतिक दत्तक दिनाच्या निमित्ताने हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येत असल्याने खूप आनंद होत असल्याच्या भावना कल्याणी सरदेसाई यांनी व्यक्त केल्या. आज सायंकाळी पाच नंतर हे पुस्तक ऍमेझॉन वरती खरेदीसाठी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III