_MPC_DIR_MPU_III

Kamshet: मुंबईहून मावळात घरी आलेला तरुण निघाला कोरोना पॉझिटीव्ह, मावळच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव

Kamshet: A young man who came home to Maval from Mumbai detected corona positive, corona infiltration in rural areas of Maval

एमपीसी न्यूज – मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे मावळातील अहिरवडे येथील आपल्या घरी परतलेल्या आठजणांपैकी एक 35 वर्षीय तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आला आहे. आतापर्यंत कोरोना संक्रमणापासून दूर असलेल्या मावळच्या ग्रामीण भागातही कोरोना विषाणूने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यामुळे अहिरवडे गावाला कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

तळेगाव दाभाडे येथील एक नर्स व माळवाडी येथील एका नर्स पाठोपाठ आता मावळच्या ग्रामीण भागात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. तळेगाव येथील नर्सचा शासकीय रुग्णालयातील कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आलेला असल्याने तालुक्यातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या दोन झाली आहे.

मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी या माहितीस दुजोरा दिला. मुंबईत भाजी विक्रीचा व्यवसाय करणारे दोन भाऊ, त्यांची पत्नी व प्रत्येकी दोन मुले असे आठजण मावळातील अहिरवडे या गावी 12 मे रोजी आले. घरातील आई-वडील व हे आठजण असे दहाजणांचे कुटुंब 12 मेपासून घरातच क्वारंटाईन होते. त्यापैकी एका 35 वर्षीय तरुणाला त्रास होऊ लागल्याने काल (सोमवारी) औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल आज प्राप्त झाला.

_MPC_DIR_MPU_II

हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून त्या कुटुंबातील उर्वरित नऊजणांनाही औंध येथील जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे.  हे पूर्ण कुटुंब 12 मेपासून घरातून बाहेर पडलेले नसल्यामुळे गावात कोरोना संक्रमण झाले असण्याची फारशी शक्यता नाही. तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी अहिरवडे गावाला कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करणारा आदेश काढला आहे. या गावापासून पाच किलोमीटरच्या परिक्षेत्रात येणारी चिखलसे, साते व नायगाव ही तीन गावे बफर झोनमध्ये येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

तळेगावमध्ये व माळवाडी येथील वातावरण निवळत असतानाच अहिरवडे येथे नवीन कोरोना रुग्ण सापडल्यामुळे मावळवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.

मावळातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्वास ठेवू नये, शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे. शक्यतो आपापल्या घरीच थांबावे, विनाकारण फिरणे टाळावे, वैयक्तिक आरोग्याची व कुटुंबाची काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, कोठेही गर्दी करू नये, सुरक्षित अंतर पाळावे, कोरोनाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. लोहारे यांनी केले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1