Kamshet : हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितल्याच्या कारणावरून आचाऱ्यास मारहाण; चोघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जेवणाचे बिल मागितल्याच्या कारणावरून हॉटेलमध्ये एका आचाऱ्यास मारहाण करण्यात आली. पवन मावळातील मौजे कडधे गावच्या हद्दीतील हॉटेल सुवर्ण सम्राट महागावचे येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात चोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी आचारी निवृत्ती बंडू सुतार ( वय ३६, रा. मळवंडी ठुले ) यांनी कामशेत पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश सावंत, स्वप्नील तरस, आणि त्यांचे बरोबर दोन अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  • कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ( दि. ६) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कडधे गावच्या हद्दीतील हॉटेल सुवर्ण सम्राट येथे प्रकाश सावंत, स्वप्नील तरस, (पूर्ण नाव माहित नाही) आणि त्यांचे बरोबर दोन अनोळखी इसम (रा. थुगाव, मावळ) हे जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर बिल घेण्यासाठी हॉटेलचे आचारी निवृत्ती बंडू सुतार गेले.

यावेळी बिल मागितल्याच्या कारणावरून चिडून शिवीगाळ करीत हाताने लाथाबुक्क्यांनी आचारी निवृत्ती सुतार यांना मारहाण केली. तर, प्रकाश सावंत याने शेजारील काचेची बाटली त्यांच्या उजव्या डोळ्याच्या वर कपाळावर मारून सर्वजण निघून गेले. यात सुतार जखमी झाल्याने त्यांना हॉटेल व्यवस्थापक सीताराम शेट्टी यांनी उपचारासाठी कामशेत येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी आचारी निवृत्ती बंडू सुतार यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.