Kamshet : विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमली अवघी कामशेतनगरी !

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शंकरराव शेळके यांच्या पुढाकाराने व लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान तसेच विट्ठल परिवार मावळ संस्थापक नितीन महाराज काकडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवारी सकाळी काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. दिंडी मिरवणूक आणि रिंगणाने अवघी कामशेतनगरी विठ्ठलमय होऊन गेली होती.

सकाळी 8 ते 10 या वेळेत कामशेत चौकातून टाळ-मृदुंगाच्या गजरात सर्व वारकऱ्यांच्या समवेत दिंडी मिरवणूक काढण्यात आली. वारकरी संप्रदयातील जेष्ठ वारकऱ्यांचे यथोचित सन्मान करून त्यांना रथामध्ये बसवून त्यांची मिरवणूक चौकातून कार्यक्रमस्थळी आणण्यात आली. विट्ठलनामाच्या गजरात रिंगण पार पाडले. या रिंगणामध्ये प्रथम माऊलींचे अश्व धावले. या अश्वामागे विणेकरी, मृदुंगाचार्य, टाळकरी, झेंडेकरी व तुळस घेऊन महिला, वृद्ध, बाल, तरुण वारकरी धावले. अतिशय भक्तिमय वातवरणात, अमृतानुभवाचा स्वाद घेत हे रिंगण पूर्ण झाले.

त्यानंतर काल्याच्या कीर्तनाला सुरवात झाली. श्री क्षेत्र देहु येथील गाथा मंदिराचे प्रवर्तक विश्वस्त हभप पांडुरंग महाराज घुले यांच्या प्रासादीक वाणीने या काल्याचे कीर्तन संपन्न झाले. या सोहळ्यास संपूर्ण मावळ तालुक्यातील हजारो वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, मृदुंगचार्य, गायनाचार्य तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज, ज्येष्ठ नेते, सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या सप्ताहामध्ये अनेक नामवंत कीर्तनकरांची किर्तनरूपी सेवा झाली. त्यामध्ये धर्मराजमहाराज हांडे, विश्वनाथमहाराज वारिंगे, बाबामहाराज सातकर, ज्ञानेश्वर (माऊली) कदम, संदीप महाराज शिंदे, बाळकृष्णदादा वसंतगडकर, अनिलमहराज पाटील व पांडुरंगमहाराज घुले अशा नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तानांच्या श्रवणाचा लाभ सर्व भाविकांना मिळाला.
या सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण मावळ तालुका भक्तीरसात तल्लीन झाला होता.

आषाढी-कार्तिकी वारीचे यथार्थ दर्शन या सप्ताहात झाले, या सप्ताहाचे प्रणेते सुनील शेळके यांचे सर्व कीर्तनकारांनी तोंड भरून कौतुक केले. त्यांच्या हातुन असेच सत्कार्य घडत राहो व त्यांची उत्तरोतर अशीच प्रगती होवो, असे आशीर्वाद सर्व वारकऱ्यांनी दिले. नाणे मावळ, आंदर मावळ, पवन मावळ असा तिन्ही मावळांचा त्रिवेणी संगम हे या सप्ताहाचे खरे वैशिष्ट्य ठरले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.