Kamshet Crime : पैशांच्या कारणावरून 17 वर्षीय मुलाचा वस्तरा व सुरीने वार करून खून; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून दोघांनी मिळून एका 17 वर्षीय मुलाचा वस्तऱ्याने आणि सुरीने वार करत निर्घृणपणे खून केला. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. 16) रात्री कामशेत जवळील डोंगराच्या पायथ्याला घडला. याप्रकरणातील दोन्ही आरोपींना कामशेत पोलिसांनी अटक केली आहे.

साहिल सादिक शेख (वय 20, रा. सहारा कॉलनी, कामशेत), अल्ताफ लतिफ सय्यद (वय 20, रा. दत्त कॉलनी, कामशेत) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. समीर बाबू शेख (वय 17, रा. पंचशील कॉलनी, कामशेत) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल आणि मयत समीर यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला होता. त्यावेळी समीरने साहिल याला आईवरून शिवीगाळ केली होती. त्याचा राग साहिलच्या मनात होता. त्यातूनच साहिल आणि अल्ताफ या दोघांनी मिळून समीरला सोमवारी रात्री दुचाकीवरून कामशेत जवळील जुना पुणे-मुंबई महामार्गाजवळ असलेल्या छत्री पॉईंट जवळील डोंगराच्या पायथ्याला नेले.

डोंगराच्या पायथ्याला वन विभागाच्या जागेत आरोपींनी समीरवर वस्तरा आणि सुरीने सपासप वार केले. तसेच दगडाने डोक्यात मारले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या समीरचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर दोन्ही आरोपी पळून गेले. कामशेत पोलिसांनी दोन दिवसानंतर कामशेत पोलिसांनी दोन्ही आरोपींचा माग काढत त्यांना बेड्या ठोकल्या. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणा-या आरोपींनी पोलिसांच्या दांडक्याचा प्रसाद मिळताच गुन्हा कबूल केला. कामशेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.