Kamshet : कामशेतजवळ पाथरगाव खिंडीत वाळूचा ट्रक उलटला

एमपीसी न्यूज – कामशेतजवळ जुना पुणे-मुंबई महामार्गावर वाळूने भरलेला ट्रक उलटला. खिंडीतून ट्रक चढू न शकल्याने हा अपघात झाला आहे. वेळीच ट्रकमधून उडी मारल्याने चालक सुखरूप बचावला आहे. ही घटना आज, बुधवारी (दि. 12) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास मुंबई-पुणे लेनवर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जुना पुणे-मुंबई महामार्गावरून वाळूने भरलेला एक ट्रक (एम एच 12 / सी टी 8043) कामशेतकडून पाथरगावच्या दिशेने जात होता. पाथरगाव खिंडीत आल्यानंतर ट्रक ओव्हरलोड असल्याने खिंडीच्या चढावरून ट्रक पुढे जाऊ शकला नाही. दरम्यान, ट्रक अचानक मागे येऊ लागला. चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि त्याने ट्रक मधून वेळीच खाली उडी मारली. काही अंतर मागे गेल्यानंतर ट्रक महामार्गावर उलटला.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. महामार्गावरील या घटनेमुळे सुमारे तासभर काही किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी उलटलेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.