BNR-HDR-TOP-Mobile

Kamshet : शेतक-यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी मावळातील पाच हजार महिला घालणार साईबाबांना साकडे

समाजसेवक देविदास गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आगळा-वेगळा उपक्रम 

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – आर्थिक संकटांमुळे नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या बळीराजावर साईबाबांची कृपा व्हावी आणि आत्महत्येच्या विचारांपासून तो परावृत्त व्हावा, यासाठी शिर्डीच्या साईबाबांना साकडे घालण्यासाठी मावळ तालुक्यातील पाच हजार महिला शिर्डीला जाणार आहेत. कामशेत येथील तरुण समाजसेवक पै. देविदास अनंता गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मोफत साईबाबा दर्शन’ हा आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मागील वर्षीही देविदास गायकवाड यांनी याच उपक्रमाअंतर्गत मावळ तालुक्यातील दोन हजार महिलांसोबत कोल्हापूर येथील महालक्ष्मीला साकडे घातले होते.

पै. देवाभाऊ गायकवाड मित्र परिवार यांच्यातर्फे या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रविवार (दि. 20) रोजी पाच हजार महिला शिर्डी येथील साईबाबा दर्शनासाठी जाणार आहेत. यावेळी सर्व महिला राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबविण्याचे साकडे साईबाबांच्या चरणी घालणार आहेत. रविवारी सकाळी साडेआठ वाजता नायगाव कामशेत येथील हिरकणी लॉन्स रिसॉर्ट येथून वाहनव्यवस्था करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील बहुतांश महिलांना आर्थिक अडचणी असतात. त्यामुळे त्यांना देवदर्शनासाठी जाण्याचा फार क्वचित योग येतो. शिर्डी येथील साईबाबा हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. ग्रामीण भागातील महिलांचे शिर्डी साईबाबा दर्शनाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी पै. देविदास गायकवाड यांनी हा उपक्रम आयोजित केला आहे.

HB_POST_END_FTR-A4

.