Kamshet : समोरासमोर दुचाकी आल्याने झालेल्या वादात दोन गटात मारहाण ; परस्पर विरोधी फिर्याद दाखल

एमपीसी न्यूज- समोरासमोर दुचाकी आल्यामुळे वाद होऊन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. कामशेत मधील इंद्रायणी कॉलनीमध्ये शुक्रवार ( दि. ३१) रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी ऋषिकेश गणेश ओव्हाळ ( वय १९ वर्ष रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत ता. मावळ जि. पुणे ) व सुनील मधुकर गायकवाड (वय २३ वर्ष रा. कांब्रे ता. मावळ जि. पुणे ) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल केली आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी कॉलनी रस्त्यावर दोन मोटार सायकल समोरासमोर आल्याचे कारणावरून ऋषिकेश ओव्हाळ व त्याचा मावस भाऊ केतन शिंदे, कमलेश शिंदे, आकाश साळवे (सर्व रा. इंद्रायणी कॉलनी कामशेत) यांना हाताने व दगडाने मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली. यावेळी केतन शिंदे व कमलेश शिंदे यांना डोक्यास दुखापत झाली.

या प्रकरणी सुनील मधुकर गायकवाड, देवेंद्र बाळू गायकवाड (दोघे रा. कांब्रे ) व दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक एस जे शिंदे करीत आहे.

सुनील गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंद्रायणी कॉलनीमध्ये मोटार सायकल समोरासमोर आल्याचे कारणावरून सुनील मधुकर गायकवाड व देवेंद्र बाळू गायकवाड (दोघे रा. कांब्रे ) यांना हाताने व दगडाने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून सुनील मधुकर गायकवाड याचे डोक्यास दुखापत केल्याप्रकरणी केतन प्रदीप शिंदे, कमलेश प्रदीप शिंदे, ऋषिकेश गणेश ओव्हाळ (सर्व रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत ता. मावळ जि. पुणे ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक एम व्ही सकपाळ करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.