Kamshet News : ‘किनारा’ आणि ‘स्माइल’ने त्याला सावरले; दोन वर्षांनी झाली कुटुंबियांची भेट

एमपीसी न्यूज – दिदोड (जि. छतरपुर, मध्यप्रदेश) येथून 1800 किलोमीटर व्यसनाच्या धुंदीत भरकटत कामशेत येथे पोहचलेल्या 29 वर्षीय युवकाला ‘किनारा’ आणि ‘स्माइल’ या संस्थांनी सावरले. व्यसनाच्या विळख्यातून त्याला बाहेर काढत निवारा दिला व तब्बल दोन वर्षांनी त्याच्या कुटुंबियांचा शोध घेऊन त्यांची भेट घडवून आणली.

राजन सेन (वय 29, रा. दिदोड, जि. छतरपुर, राज्य. मध्य प्रदेश) असे या युवकाचे नाव आहे.

किनारा वृद्ध व मतिमंद सेवा ट्रस्टच्या संचालिका प्रिती वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘किनारा’च्या निराधार शोध मोहीमेअंतर्गत 2 फेब्रुवारी 2021 रोजी कामशेत- पवना रस्त्यावर राजन भटकताना दिसला. त्याची विचारपूस केली, तो घाबरलेला होता.

त्याला वृद्धाश्रमात आणले. त्याची दाढी करून अंघोळ घालून नवीन कपडे दिले. खाऊ घातले. आरोग्य तपासणी केली. तेव्हा कळाले तो पंचवीस दिवस जेवला नव्हता. त्याला गांजाचे व्यसन लागल्याने त्यांनी ‘स्माइल’ व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष हर्षल पंडित यांच्याशी संपर्क साधला.

राजनला स्माइलचे सदस्य उर्से येथे नव्याने सुरु झालेल्या व्यसनमुक्ती केंद्रात पुनर्वसनासाठी घेऊन गेले. त्याला नीट बोलता येत नव्हते. बरेच दिवस पोटात अन्न नसल्याने त्याला सुरुवातीला त्रास झाला. दोन तीन दिवसांनी त्याची पचनशक्ती पूर्ववत होऊ लागली.

विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद वाढला. हळूहळू त्याची व्यसनाची सवय मोडायला लागली. तीन महिने स्माइल केंद्रात त्याची योग्य काळजी घेतली गेली. त्याची मनस्थिती पूर्ववत होऊ लागल्याने त्याला पुन्हा किनारा वृद्धाश्रमात आणण्यात आले. त्यानंतर त्याचा पत्ता शोधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

पत्ता शोधण्यासाठी सात तास परिश्रम

किनारा वृद्ध व मतिमंद सेवा ट्रस्टच्या संचालिका प्रिती वैद्य म्हणाल्या, राजनचा पत्ता शोधण्यासाठी सात तास सलग परिश्रम घेतले. गुगलच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क साधून माहिती घेण्यात आली. कामशेत पोलीस तसेच मध्य प्रदेश पोलिसांनी देखील यासाठी सहकार्य केल्याचे वैद्य यांनी सांगितले. राजनच्या कुटुंबियांनी दोन वर्षांपूर्वी (2019) त्याची मिसींग तक्रार दिल्याचे इसापूर पोलिसांनी सांगितले. त्यानंतर रितसर माहिती घेऊन राजनचा सख्खा भाऊ व बहिणीचा दिर असे दोघे वृद्धाश्रमात येऊन राजनला घेऊन गेले.

तुमच्या रुपाने ‘देव’च भेटला

दोन वर्षांनंतर आपल्या भावाला सुखरूप पाहून राजनच्या भावाला अश्रू अनावर झाले. दोन वर्ष भाऊ घरी नसल्याने घरी कोणताही सण साजरा केला नसल्याचे त्याने सांगितले. तसेच, आपला मुलगा सुखरूप असून घरी परत येणार असल्याने राजनच्या आईचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तुमच्या रुपाने ‘देव’च भेटला, अशी प्रतिक्रिया राजनच्या कुटुंबीयांनी किनारा वृद्ध व मतिमंद सेवा ट्रस्टच्या संचालिका प्रिती वैद्य यांना दिली.

राजनचा सख्खा भाऊ आणि बहीणीचा दिर हे दोघे आज (शनिवारी) राजनला घेऊन आपल्या गावी परत गेले. जाताना त्यांनी ‘किनारा’ आणि ‘स्माइल’ या दोन संस्थांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.