Kamshet News : कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नग्नावस्थेत झोपणाऱ्या निराधाराला किनारा वृद्धाश्रमाचा आधार

एमपीसी न्यूज – कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नग्नावस्थेत झोपून दिवस काढणाऱ्या निराधार इसमाला किनारा वृद्धाश्रमाने आधार दिला आहे. चाळीस वर्षीय हा इसम काहीही बोलत नसून बरेच दिवस मुंबई हायवेवर भटकत होता. कचरा ढिगाऱ्याजवळ राहून तो आपले दिवस काढत असल्याने किनारा वृद्धाश्रमाच्या वतीने त्याला आधार दिला.

किनारा वृद्ध व मतिमंद सेवा ट्रस्टच्या संचालिका प्रिती वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती अनेक दिवसांपासून सावरोली चारफाटा ( ता. खालापूर) याठिकाणी कचरा ढिगाऱ्याजवळ नग्नावस्थेत झोपत असल्याची माहिती किशोर हडप यांनी किनारा वृद्धाश्रमाला दिली. त्यानुसार आम्ही प्रत्यक्ष त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. इसमाला माहिती विचारली असता तो व्यक्ती काहीही बोलत नव्हता, त्याला आधाराची गरज असल्याचे दिसून आले.

घटनास्थळी 108 ची रुग्णवाहीका बोलून त्या इसमाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्यांची ॲन्टीजेन कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्याला किनारा वृद्धाश्रम, कामशेत याठिकाणी नेण्यात आले. खालापूरचे पोलीस, 108 व किशोर हडप यांनी यासाठी सहकार्य केल्याचे प्रिती वैद्य यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.