Kamshet News : वर्षाविहारासाठी गेलेल्या पिता व दोन पुत्रांचा धबधब्याखालील पाण्यात बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज – सुट्टीच्या दिवशी मावळातील धबधबे पाहण्यासाठी गेलेल्या दोन मुले आणि त्यांचे वडील अशा तिघांचा मृत्यू झाला. ही घटना आज (रविवारी, दि. 25) कुसगाव खुर्द येथे घडली.

साई पिराजी सुळे (वय 14), सचिन पिराजी सुळे (वय 12), पिराजी गणपती सुळे (वय 45, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत. मूळ रा. नायगाव वाडी, जि. नांदेड) अशी बुडालेल्या पिता-पुत्रांची नावे आहे.

रविवारी सकाळी पिराजी सुळे त्यांच्या दोन्ही मुलांना घेऊन कुसगाव खुर्द येथील धबधबे पाहायला गेले होते. धबधब्याच्या खाली भिजत असताना पायथ्याशी असलेल्या खड्ड्यात दोन्ही मुले अचानक बुडू लागली. बुडत असलेल्या मुलांना वाचवण्यासाठी पिराजी गेले. मात्र ते देखील पाण्यात बुडू लागले.

तिघेही बुडत असताना बाजूलाच जनावरे राखणाऱ्या एका शेतकऱ्याने हा प्रकार पाहिला. त्या शेतकऱ्याने आरडाओरडा करून गावकऱ्यांना गोळा केले. गावकऱ्यांनी तिघांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता.

तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. कामशेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.