Kamshet : भरदिवसा घरफोडी करून पावणेचार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजावाटे भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 3 लाख 82 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार सोमवारी (दि. 10) दुपारी बारा ते अडीचच्या सुमारास मावळ तालुक्यातील येवलेवाडी येथे घडली.

अविनाथ तानाजी जाधव (वय 29, रा. दर्पण सोसायटी, येवलेवाडी, ता. मावळ) यांनी याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश यांची कामशेत येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावर पानटपरी आहे. सोमवारी पत्नीची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनी टपरी उघडली नाही. दुपारी मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी आईला सांगितले.

अविनाश त्यांच्या पत्नीला घेऊन कामशेत येथील सरकारी दवाखान्यात गेले. दवाखान्यातून परत आल्यानंतर त्यांचे घर उघडे दिसले. त्यांनी घरात जाऊन बघितले असता लोखंडी कपाट उघडे होते. कपाटातून सोन्याचे गंठण, चेन, गंठण मणी आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे समजले.

दरम्यान अविनाश यांनी दवाखान्यात जाताना गडबडीत घराचा दरवाजा कुलूप न लावता ओढून घेतला होता. अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून दागिन्यांवर डल्ला मारला आहे. कामशेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.