Kamshet: व्हीआयटी कॉलेजमधील तिजोरी फोडून एक लाख रुपयांची चोरी; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कामशेतच्या सुमन रमेश तुलसियानी इंटरनॅशनल हायस्कूल अँड इंजिनिअरिंग (व्हीआयटी) येथे आज (मंगळवारी) पहाटे तीनच्या सुमारास कॉलेजच्या इमारतीच्या पाठीमागील भिंतीची लोखंडी जाळी उचकटून आत घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी तिजोरी फोडून एक लाख दोन हजार रुपये लंपास केले.

याप्रकरणी कॉलेजचे इस्टेट मॅनेजर निलेश जयसिंग गारगोटे (वय 37 वर्ष रा. वारजे, पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत कामशेत पोलिसांनी माहितीनुसार, आज (मंगळवार) पहाटे 5.40 च्या सुमारास कॉलेज कॅन्टीनमधील स्वयंपाकी सचिन कोकरे हे कॅम्पसमध्ये आले असता गेट उघडण्यासाठी गेलेले सुरक्षारक्षक अनिल गरुड आणि नामदेव बांगर यांना जिन्याच्या जवळ एक तिजोरी तोडलेल्या स्थितीत दिसली.

यावेळी त्यांनी निलेश गारगोटे यांचे सहायक नवनाथ शिंदे यांना हा प्रकार सांगितला. नवनाथ शिंदे यांनी कॉलेजमध्ये सर्व पहाणी केली असता चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला.

यावेळी तात्काळ त्यांनी कामशेत पोलिस ठाण्यात या प्रकरणाची माहिती दिली असता कामशेत पोलिसांसह अधिकारी व डीवायएसपी नवनीत कावत तसेच श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सर्व कॉलेज परिसराची पाहणी केली.

यावेळी अज्ञात चोरट्यांनी कॉलेजमधील तिजोरी फोडून सुमारे एक लाख दोन हजार रुपये इतकी रक्कम चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी कामशेत पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास कामशेत पोलीस ठाण्याचे फौजदार मृगदीप गायकवाड हे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.