Kamshet : नराचा नारायण करण्याचे सामर्थ्य फक्त सद्गुरुंकडेच – वसंतगडकर महाराज

एमपीसी न्यूज- प्रपंच करताना कोणाची संगत करायची हे खूप महत्वाचे आहे, देवप्राप्ती होईल अशी संगत माणसाने धरावी. त्यासाठी सद्गुरुवाचून पर्याय नाही. तुमचा आमचा जन्म हा नराचा नारायण होण्यासाठीच आहे आणि ते सामर्थ्य केवळ सद्गुरूंकडेच आहे, असे प्रतिपादन कीर्तनकार हभप बाळकृष्णदादा वसंतगडकर (कराड) यांनी केले.

तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुनील शेळके यांच्या पुढाकाराने लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघ व ‘श्री विठ्ठल परिवार, मावळ’ यांच्या वतीने कामशेत येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पाचव्या दिवशी बाळकृष्णदादा वसंतगडकर यांचे कीर्तन झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, मावळ भाजपचे नेते भास्करराव म्हाळसकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, तळेगाव दाभाडेचे नगरसेवक अमोल शेटे आदी उपस्थित होते. सप्ताहातील पाचव्या दिवशी भाविकांच्या गर्दीचाही उच्चांक झाला. दहा हजार पेक्षा अधिक भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेतला.

कीर्तनकार बाळकृष्णदादा वसंतगडकर यांनी कीर्तनासाठी ‘नको नको मना गुंतू मायजाळी । काळ आला जवळी ग्रासावया ।। काळाची ये उडी पडेल बा जेव्हा । सोडविणा तेव्हा मायबाप ।। सोडविणा बंधू पाठची बहीण । शेजेची कामिन दूर राहे ।। सोडविणा राजा देशाचा चौधरी । आणिक सोयरी भलीभली ।। तुका म्हणे तुज सोडविणा कोणी । एका चक्रपाणी वाचोनिया ।।’ हा संत तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील अभंग घेतला होता. फक्त सद्गुरूच्या कृपेनेच जीव परमात्मारूप होतो. तो नारायण ज्या गावी आहे त्या गावाला जायचे असेल तर त्या गावाला जो जाऊन आला आहे त्याची संगत करणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी सद्गुरू ओळखा आडरानाला धावू नका, असे वसंतगडकर महाराज म्हणाले.

भगवंत आहे म्हणूनच प्रपंच आहे. जिवंत शरीरात प्राण आहे तोवरच त्याला किंमत आहे. म्हणून त्या परमात्म्याला किंमत दिली पाहिजे. ह्या मायेला धरून राहिलो तर देवप्राप्ती होणार नाही. ही माया म्हणजे मुळातच मुंगी एवढी आहे पण तिच्यात अडकल्यामुळे देवाला विसरलो. तिने ब्रम्हादिकांपासून सर्वांना भुरळ पाडली आहे. आपण वैकुंठाचे होतो मायेच्या अधीन गेलो, जी आधी नव्हती, बळे आली, आणि ही देहरूपी पेटी आपल्या ताब्यात दिली आणि जी पळाली ती चौऱ्यांशी लक्ष योनी फिरलो तरी सुटका करवून घेतली नाही ह्या पेटीची चावी म्हणजे ब्रम्हरंध्रा होय. ती चावी सापडली पाहिजे. आणि ती चावी सद्गुरुशिवाय सापडणार नाही म्हणून तुकाराम महाराज सांगतात की बाकी कशातच अडकू नका, यातून सोडवणारा एकच चक्रपाणी आहे, असे वसंतगडकर महाराजांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.