Kamshet : तिकोना किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन साजरा

एमपीसी न्यूज- किल्ले तिकोणागडावर गुरुवारी गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी दुर्गसंवर्धनाच्या कामासाठी चुन्याचा मिक्सर गडावर आणण्यात आला.

गडावर होत असलेल्या विविध कार्यक्रमांसाठी नवीन मांडव खरेदी करण्यात आला. या मांडवामध्येच शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
नवीन मांडवातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पोलीस नाईक संदीप ओझरकर, आफताब सैय्यद व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवाजी महाराज यांचे पूजन करण्यात आले.

मालवाहतूक करीता बांधलेल्या रोप वेच्या साहाय्याने दुर्गसंवर्धन कामासाठी चुन्याचा मिक्सर गडावर आणण्यात आला. वडगांव मावळ येथील “ला फॅब्रिका एक्सटेरीअर्स चे मालक सलीम शेख व आफताब सय्यद, यांनी हा मिक्सर तयार केला असून त्याला १ लाख रुपयांचा खर्च आला आहे. या मिक्सरचे उद्घाटन पोलीस नाईक संदीप ओझरकर यांचे हस्ते करण्यात आले. मिक्सर बनवणारे आफताफ सय्यद यांचा सन्मान करण्यात आला.

जीपीएस च्या मदतीने गडाचा सर्व्हे करण्यात आला असून लवकरच ड्रोनच्या साहाय्याने गडाचे थ्री डी मॅपिंगचे काम सुरु करण्यात येणार आहे. गडावर दुर्गसंवर्धनाच्या दृष्टीने सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आली असुन त्या व्दारे तिकोणागडाचे शास्त्रीय दृष्टिने संवर्धन पुढील काळात करण्यात येणार आहे अशी माहिती गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचे पदाधिकारी गणेश जाधव यांनी दिली. यावेळी सचिन ढोरे, माऊली मोहोळ, जाकीर शेख, मोईन शेख, संजय गायकवाड हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.