Kamshet : हृदयविकाराच्या त्रासाला कंटाळून इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – हृदयविकाराच्या त्रासाला कंटाळून इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, सोमवारी (दि. 16) पहाटे साडेचारच्या सुमारास मावळ तालुक्यातील येवलेवाडी नायगाव येथे उघडकीस आली.

ज्ञानदेव किसन पुंड (वय 56, रा. येवलेवाडी नायगाव, ता. मावळ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कल्‍पना ज्ञानदेव पुंड (वय 50) यांनी याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कल्पना, त्यांचे पती ज्ञानदेव, मुलगा संतोष आणि सून जयश्री असे चार जणांचे कुटुंब मावळ तालुक्यातील येवलेवाडी नायगाव येथे राहत आहे. मयत ज्ञानदेव माटुंगा मुंबई येथे रेल्वे विभागात नोकरी करत होते. मागील काही दिवसांपासून त्यांना हृदयविकाराचा आजार होता. त्यांची बायपास सर्जरी देखील झाली होती. मागील दहा दिवसांपासून त्यांचा त्रास वाढला होता.

रविवारी रात्री पुंड कुटुंबीय जेवण झाल्यानंतर झोपी गेले. सर्वजण झोपल्यानंतर ज्ञानदेव यांनी कपडे वाळत घालण्याच्या दोरीने छताच्या अँगलला गळफास घेतला. पहाटे साडेचारच्या सुमारास कल्पना झोपेतून उठल्या असता हा प्रकार समोर आला. त्यांनी तात्काळ ज्ञानदेव यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.