Kamshet : संतसंगतीमुळेच मनुष्याच्या मनात भक्तीचे अंकुर फुटतात – विश्वनाथ महाराज वारिंगे

एमपीसी न्यूज – भक्तीविना जगण्याला किंमत नाही. भक्ती करण्यासाठी आधी संतसंगत करावी. संतसंगतीनेच मनुष्याच्या मनात भक्तीचे अंकुर फुटतात. त्यातूनच पुढे मानवी जीवनाचे सार्थक होते, असे प्रतिपादन नामवंत कीर्तनकार विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी केले.

आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात विश्वनाथ महाराज वारिंगे यांचे कीर्तन झाले. त्यात त्यांनी कीर्तनरुपी सेवेसाठी संत नामदेव महाराजांचा ‘ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले , उद्धाराया आले दीनजना..’ या अभंगाची निवड केली होती. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव मावळचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे तसेच वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्ते जीवनमामा खानेकर उपस्थित होते.

वारिंगे महाराज म्हणाले की, संतांचे अभंग हे गोड व प्रासादीक असतात. कितीही जुने झाले तरी ते लोप पावत नाहीत. त्यातील गोडवा कमी होत -नाही. संतवचन हे गोडच असते. देवाला समर्पित असणाऱ्या वाणीला प्रासादीक वाणी म्हणतात. वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्माच्या कार्यात सर्व संतांचे योगदान मोठे आहे. संत हे महान असतातच, पण त्यांचे आप्त संत होत नाहीत. याला संत नामदेव महाराजांचे कुटुंब अपवाद होते. त्यांचे 14 जणांचे संपूर्ण कुटुंब हरीभक्ती करीत होते. परमार्थ करत नाहीत, ते या पृथ्वीवरील केवळ पाषाण आहेत. त्यांचे जगणे व्यर्थ आहे. संत हे या इहलोकात दीनजनांचा उद्धार करण्यासाठीच आलेले असतात.

संत हे ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. अशा संतांचे नाव घेतले तरी पुण्याची प्राप्ती होते. प्रातःकाळी दुर्जनाचे नाव घेतले तर महापाप लागते. दुर्जनातही भगवंत असला तरी त्याच्या सान्निध्यात राहू नये. सज्जन माणसाच्या, संतांच्या नामस्मरणामध्ये वाणी तुटू देऊ नये. म्हणून नामदेव महाराज संतांच्या संगतीचा आग्रह धरतात व त्यांची वाट पाहतात, असे वारिंगे महाराज यांनी सांगितले.

हरीनाम सप्ताहाचे मुख्य संयोजक तसेच तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुनील शेळके हे धर्म टिकविण्याचे काम करीत आहेत. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराज व तुकाराम महाराज यांनी परमार्थ आणि राजकारणाची सांगड घातली, तशीच गोड सांगड यावेळी श्री विठ्ठल परिवार व सुनील शेळके यांनी घातली आहे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.