Kamya critisizes Kangana : काम्या पंजाबीने साधला ‘क्वीन’वर निशाणा

0

एमपीसी न्यूज – तीन महिन्यांपूर्वी युवा अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या झालेल्या आकस्मिक मृत्यूनंतर उठलेल्या वादळाने आता वेगळेच वळण घेतलेले आहे. नेपोटिझमपासून सुरु झालेला वाद आता ड्रग्जपर्यंत येऊन पोचलेला आहे. यात बॉलिवूडची ‘क्वीन’ अभिनेत्री कंगना रानावतने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आगीत तेल ओतण्याचे काम शिस्तबद्ध पद्धतीने केले आहे. काही दिवसांपूर्वी तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती.

या वक्तव्यामुळे तिच्यावर प्रचंड टीका झाली. त्यानंतर मोदी सरकारने कंगनाला Y+ श्रेणीतील सुरक्षा दिली. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री काम्या पंजाबी हिने कंगनावर निशाणा साधला आहे. ‘जस्टिस फॉर सुशांत’ म्हणत सुरु झालेलं प्रकरण आता ‘जस्टिज फॉर कंगना’वर आलंय, असा उपरोधिक टोला तिने लगावला आहे.

‘जस्टिस फॉर सुशांत असं म्हणत सुरु झालेलं हे प्रकरण आता जस्टिस फॉर कंगना आणि जस्टिस फॉर रवी किशन पर्यंत पोहोचलंय. उद्या कोणी दुसरा येईल परवा कोणी तिसरा. गटर कोण आहे? ड्रग्स कोण घेत होतं? Y+ श्रेणीतील सुरक्षा कोणी घेतली? विचार करा या सर्व घडामोडींमध्ये सुशांत कुठे आहे?’ अशा आशयाचं ट्विट करुन काम्याने कंगनावर जोरदार टीका केली आहे. तिचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.