Kangana Ranaut : ‘नऊ सप्टेंबरला मुंबईत येतेय, कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबून दाखवा’ – कंगना राणावत

यापूर्वी अभिनेत्री कंगना राणावतने 'मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते', असे विधान केले होते.

एमपीसी न्यूज – सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणावरून कंगना राणावतने बॉलीवूडसह राजकीय नेते आणि मुंबई पोलिस यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यानंतर, तिने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केली त्यानंतर सोशल मीडियावर कंगना विरुद्ध संतापाची लाट उसळली. त्यातच आता कंगना राणावतने आणखी एक वादग्रस्त ट्विट केले आहे.

‘बरेच लोकं मला मुंबईत परत येऊ नकोस, अशी धमकी देत आहेत. म्हणून मी येत्या आठवड्यात नऊ सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबून दाखवा’ या आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे.

यापूर्वी अभिनेत्री कंगना राणावतने ‘मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते’, असे विधान केले होते. त्यानंतर भाजपाचे आमदार राम कदम यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये कदम यांनी कंगणाला सुरक्षा देण्याची मागणी केली होती.

कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं. मुंबईची भीती वाटत असेल तर कंगनाने परत येऊ नये अशी टीका राऊत यांनी केली होती.

या वक्तव्यावरुन राऊत यांच्यावर टीका करताना कंगानाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली.

‘शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि मी पुन्हा मुंबईत परत येऊ नये असं म्हटलं. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीच्या मागण्या करणारे ग्रॅफिटी दिसत होते आणि आता तर मला उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. ही मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे’,? असे ट्विट कंगानाने केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.