Kangana Ranaut: कंगनाच्या ट्विटर फॉलोअर्समध्ये झाली घट

लक्षवेधी बाब म्हणजे एका दिवसात सरासरी 40 ते 50 हजार नेटकरी तिला अनफॉलो करु लागले आहेत.

एमपीसी न्यूज – बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना राणावत आपल्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर गेले काही दिवस ती सातत्याने सिनेसृष्टीतील घराणेशाही, टोळीबाजी, ड्रग्स रॅकेट, नव्या कलाकारांवर होणारा अन्याय या बद्दल बोलत आहे. तिच्या या रोखठोक शैलीमुळे अल्पावधीत लाखो नेटकरी तिला ट्विटवर फॉलो करु लागले. परंतु, अचानक गेल्या काही दिवसांपासून तिचे फॉलोअर्स कमी होऊ लागले आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे एका दिवसात सरासरी 40 ते 50 हजार नेटकरी तिला अनफॉलो करु लागले आहेत.

कंगनाने स्वत: ट्विट करुन याकडे ट्विटर इंडियाने लक्ष द्यावं अशी विनंती केली आहे. “माझे ट्विटर फॉलोअर्स गेल्या काही काळात सातत्याने कमी होत आहेत. यामध्ये एक पॅटर्न असल्याचा संशय मला येतोय. दिवसाला 40 ते 50 हजार फॉलोअर्स कमी होत आहेत.

मी ट्विटरवर नवीन आहे. यामागचं कारण मला माहीत नाही. हे असं का होतंय कोणी सांगेल का?” अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं आहे. हे ट्विट तिने ट्विटर इंडियाला देखील टॅग केलं आहे. कंगनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

कंगना सध्या सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर सातत्याने प्रतिक्रिया देत आहे. सुशांतसिंह प्रकरणात रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तिने रिया चक्रवर्तीवर निशाणा साधला होता. पण उठसुठ प्रत्येकावर तोंडसुख घेणा-या कंगनाचे सुशांतसिंह मृत्यूप्रकरणातील एक संबंधित संदीपसिंह याच्याबरोबरचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आपले कुठे काही चुकते आहे काय याचा देखील कंगनाने साकल्याने विचार करावा असा तिला सल्ला देण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.