BNR-HDR-TOP-Mobile

Kanhe Phata : कान्हे फाटा येथे महामार्गावर मराठा समाजाचे भजन आंदोलन

1,970
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कान्हे फाटा येथे सकल मराठा क्रांती मोर्चा समाजाच्या वतीने रस्त्याच्या मधोमध बसून भजनाने मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनात आंदर मावळातील सर्व मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला आहे.

कान्हे गावापासून आंदर मावळातील सकल मराठा समाज बांधवांनी सकाळी नऊ वाजता एकत्र येऊन महामार्गावरील कान्हे फाटा येथे ठिय्या देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी अंजनीमाता अध्यात्मिक विकास केंद्र यांच्या वतीने भजनाला सुरुवात करण्यात आली. यात आंदर मावळातील अनेक आदिवासी बांधवांनी सहभाग घेऊन स्वयंस्पुर्तीने गाडी व भोंग्याचे नियोजन केले. शांततेत व अध्यात्मिक वातावरणात या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. यात मोठ्या संख्येने मराठा समाज सहभागी झाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभुमीवर बहुतांश वाहनचालकांनी वाहने रस्त्यावर न आणल्याने पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासून शुकशुकाट पहायला मिळाला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकरिता आज सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणाकरिता सुरु असलेल्या आंदोलनातील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर मोठी खबरदारी घेण्यात आली आहे.

वाहने तोडफोडीच्या व जाळण्याच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता वाहनचालक मालक यांनी बंदला पाठिंबा देत वाहने रस्त्यावर आणली नाहीत. मावळ तालुक्यात देखील बंदला शंभर टक्के पाठिंबा देण्यात आला असून लोणावळा शहरासह संपूर्ण मावळातील शाळा, मह‍विद्यालये, बाजारपेठ‍ा, कारखानदारी, पेट्रोलपंप तसेच सर्व व्य‍वहार बंद ठेवण्यात आले आहेत. मावळ तालुका मराठा समाजाच्या वतीने लोणावळ्यात दुपारच्या सुमारास रेल्वे रोको तर उर्से टोलनाका व तळेगाव चाकण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. संपूर्ण आंदोलन हे शांततेच्या मार्गाने करण्यात येणार असल्याचे समन्वय समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

कामशेतमध्ये शुकशुकाट, महामार्ग पडला ओस

शहरातील बाजारपेठ पूर्णतः बंद असून अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एकही वाहन नसल्याने सर्वत्र शुकशुकाट आहे. महत्वाच्या ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्तात मराठा क्रांती मोर्चा शांततेत सुरु झाला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या पार्श्वभूमीवर नाणे, पवन, आंदर मावळातील महत्वाची कामशेत बाजारपेठ पूर्णतः बंद होती. दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. शहर व आजूबाजूच्या शाळांना आधीच सुट्टी देण्यात आली होती. तर महामार्गावर व द्रुतगती मार्गावरील वाहने पोलीस यंत्रणेने जागोजागी अडवून धरल्याने दोन्ही मार्गांवर शुकशुकाट होता. तर अनेक वाहनचालकांनी आपली वाहने महामार्गाच्या कडेला मिळेल त्या जागी सुरक्षित उभी केली. महामार्गावरील हॉटेल ढाबे बंद होते. ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त होता. कान्हे येथे ठिय्या आंदोलन असल्याने मराठा समाज येथे एकवटला. कामशेतमध्ये सर्वत्र शांततेचे वातावरण होते.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.