Karajt News: कर्जत, खोपोली, खालापूरमधील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणा – श्रीरंग बारणे

होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवा; कर्जत तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

एमपीसी न्यूज – कर्जत, खोपोली, खालापूर या शहरी भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. प्रशासनाने सतर्क, दक्ष रहावे, उपाययोजना कराव्यात, कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणावी, भावनेच्या आहारी जाऊन नातेवाईक रुग्णांना भेटतात. यातूनच कुटुंबाच्या कुटुंब बाधित होत आहेत. नातेवाईकांचा रुग्णाशी संपर्क येणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्या.

होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवावे, घराबाहेर पडणार नाहीत,  त्यांच्यापासून कोरोनाचा प्रसार होणार नाही. याची खबरदारी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

कर्जत, खालापूर तालुक्यांतील कोरोना परिस्थितीचा खासदार बारणे यांनी आज (गुरुवारी) तहसील कार्यालयात आढावा घेतला. आमदार महेंद्र थोरवे, कर्जत नगरपरिषद अध्यक्षा सुवर्णा जोशी, प्रांतअधिकारी वैशाली परदेशी, कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख, खालापुरचे तहसीलदार ईरेश चपलवार, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, पोलीस उपअधीक्षक अनिल गीर्डीकर, तालुका वैद्यकीय अधिक्षक मनोज बनसोडे, कर्जत, खोपोली, खालापुर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, कर्जत तालुक्यात आत्तापर्यंत 501 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. दररोजचा आकडा 80 ते 85 च्यावर जात आहे. कर्जत विभागामध्ये कर्जत, खोपोली, खालापूर हे शहरी विभाग येतात. या शहरी भागामध्ये दक्ष राहून रुग्णांची संख्या नियंत्रित करण्याचे प्रयत्न करावेत, होम आयसोलेशन केलेल्या रुग्णाच्या बाबतीत अधिक खबरदारी घ्यावी, गाव पातळीवर समिती नेमून दक्षता घ्यावी, जेणेकरून रुग्ण बाहेर येणार नाही, पोलिसांनी त्याकडे लक्ष द्यावे. गर्दी होणाऱ्या ठिकाणावर बंदोबस्त ठेवावा, गर्दी टाळावी, गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

उपजिल्हा रुग्णालय आणि रायगड येथे चालू केलेल्या कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव आहे. त्या अनुषंगाने तिथे सुविधा द्याव्यात. स्वच्छता ठेवावी. रुग्णाच्या नातेवाईकांचा संपर्क येणार नाही याची दक्षता घ्यावी. नातेवाईक भावनेच्या आहारी जाऊन रुग्णाला भेटतात. यातूनच कुटुंबाच्या कुटुंब बाधित होत आहेत. त्याची काळजी घ्यावी.

लसीकरण केंद्रावर मोठ्या संख्येने गर्दी होते. गर्दी टाळावी. त्यासाठी लस घेण्यासाठी नागरिकांना ठराविक वेळ ठरवून देण्यात यावी. 1 मे पासून 18 वर्षापुढील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्याचे आत्तापासूनच नियोजन करण्यात यावे. यासाठी खालापूर येथील इंडस्ट्रियल झोन मध्येही लसीकरण केंद्र करावीत. यातून जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर द्यावा, अशा सूचना खासदार बारणे यांनी दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.