Kargil Victory Day: ‘ये दिल मांगे मोअर’ म्हणत कारगिल युद्धाचा चेहरा झाले होते कॅप्टन विक्रम बत्रा

Kargil Victory Day: Captain Vikram Batra was the face of the Kargil war saying 'Yeh Dil Maange More'

एमपीसी न्यूज – आज कारगिल विजय दिन! भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याचा साक्षीदार! 26 जुलै 1999 या दिवशी भारतीय सैन्याने कारगिल युद्धात विजय मिळवून पॉईंट 5140 वर तिरंगा फडकविला होता. या कारगिल युद्धात हिरो ठरले होते… कॅप्टन विक्रम बत्रा!

फक्त 18 महिन्यापूर्वी कॅप्टन विक्रम बत्रा सैन्यदलात भरती झाले होते. कारगिल युद्धात त्यांच्यावर पाकिस्तानी सैन्याने कब्जा केलेलं पॉईंट 5140 शिखर ताब्यात मिळवण्याची जबाबदारी होती. ती जबाबदारी त्यांनी अतिशय चोखपणे पार पाडली. यासाठी जेव्हा त्यांची निवड झाली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, ‘एकतर मी त्याठिकाणी तिरंगा ध्वज रोवून येईन अथवा त्याच तिरंग्यात लपेटून येईन’.

कारगिल हिरो शहीद कॅप्टन विक्रम बत्रा

अतिशय कठीण परिस्थितीत कॅप्टन विक्रम बत्रा यांनी या शिखरावर चढाई केली.  समोरासमोर झालेल्या लढाईत त्यांनी काही पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातलं. या युद्धात त्यांना वीरमरण आलं. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र देऊन गौरवण्यात आलं.

कॅप्टन विक्रम बत्रा यांचे सहकारी त्यांना शेर शहा या नावाने हाक मारायचे. युद्धाला जाण्यापूर्वी त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘ये दिल मांगे मोअर’ अशी भावना व्यक्त केली होती. एका युद्धात ते यशस्वी झाले होते, परंतु त्यांना अजून दुसरे शिखर मिळवायचं होतं….

कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यासह देशासाठी शहीद झालेल्या सर्व जवानांना ‘एमपीसी न्यूज’चे विनम्र अभिवादन!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.