Karjat News: राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी मयूर शेळके याच्या नावाची शिफारस करणार – श्रीरंग बारणे

स्वतःचा जीव धोक्यात घालून चिमुकल्याचे प्राण वाचविणाऱ्या मयूरचा खासदार बारणे यांनी केला गौरव

एमपीसी न्यूज – प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावर तोल जाऊन पडलेल्या लहान मुलाचा जीव मयूर शेळके याने वाचविला आहे. त्याने अतुलनीय शौर्य दाखविले. त्याचा राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी विचार व्हावा. राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी मयूरच्या नावाची शिफारस करणार असल्याचे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

सेंट्रल रेल्वे मुंबई डिव्हिजन मध्ये पॉइंट्समन म्हणून काम करणारा मयूर शेळके मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत मधील नेरळ तलवडे येथील रहिवासी आहे. कर्जत तहसील कार्यालयात खासदार बारणे यांनी मयूरचा आज (गुरुवारी) सत्कार केला. त्याच्या धाडसाचे, धैर्याचे कौतुक केले. त्याचे आई-वडील, कर्जत नगरपरिषद अध्यक्षा सुवर्णा जोशी, आमदार महेंद्र थोरवे, प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख यावेळी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून जाताना लहान मुलगा तोल जाऊन रेल्वे रुळावर पडला. त्यावेळी ट्रेन येत असल्याचे दिसताच मुलाचा अपघात होणार हे समजल्यावर क्षणाचा विलंब न लावता पॉइंटमन मयूर शेळकेने तत्परतेने धाव घेतली. ट्रेन येण्याआधी काही सेकंद मयूर यांनी मुलाला वाचवलं आणि स्वतः देखील प्लॅटफॉर्मवर चढले.

आपला जीव धोक्यात घालून मयूरने मुलाचा प्राण वाचविला. त्याच्या धाडसाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. मयूरचा सर्वांना अभिमान आहे. त्याचे मी कौतुक करतो. स्वतः रेल्वे खात्यात नोकरी करत असताना त्याने मुलाचा जीव वाचविला आहे. शेळके परिवाराचे अभिनंदन करतो. त्याचे हे कार्य, विचार आपल्यासाठी आणि समाजासाठी प्रेरणा दायक आहेत. त्याने अतुलनीय शौर्य दाखविले. त्याचा राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी विचार व्हावा. राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी मयूरच्या नावाची शिफारस करणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.