Karjat News: ‘पळसदरी, शहापूर, मुरबाड कर्जत रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे, चौकशी करुन दोषींवर कारवाई करा’ – श्रीरंग बारणे

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट

एमपीसी न्यूज – केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाच्या माध्यमातून भिवंडी आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील पळसदरी, शहापूर, मुरबाड आणि कर्जत या रस्त्यांचे काम सुरु आहे. चार ठेकेदारांमार्फत सुरु असलेल्या कामाचा दर्जा निकृष्ट आहे. काम गुणवत्तापूर्ण होत नाही. त्यामुळे या कामाच्या दर्जाची चौकशी करावी. यात सहभागी असलेले अधिकारी, ठेकेदार यांची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली.

यासाठी केंद्रीय सडक परिवहन, राष्ट्रीय राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांची खासदार बारणे यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. तसेच रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत सविस्तर चर्चा केली. त्याबाबतचे निवेदनही गडकरी यांना दिले. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, मावळ आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील पलसदरी ते शहापूर, मुरबाड, कर्जत दरम्यान रस्त्याचे काम सडक परिवहन मंत्रालयामार्फत केले जात आहे. हा मार्ग मुंबई-आग्रा-मुंबई-गोवा या महामार्गाला जोडला जाणार आहे. या रस्त्याचे काम चार ठेकेदारांना 20-20 किलोमीटर रस्त्याचे काम दिले आहे.

रस्ता तयार करताना गुणवत्तेचे पालन केले जात नसल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत. रस्त्याच्या कामाचा दर्जा व्यवस्थित नसल्याच्या बातम्या वारंवार स्थानिक वृत्तपत्रांमध्ये येत आहेत. या रस्त्याच्या कामाची जबाबदारी ‘एमएसआरडीसी’कडे दिली आहे. परंतु, या कामात अधिकारी आणि ठेकेदारांची मिलिभत आहे. त्यामुळे सरकारकडून करोडे रुपये खर्च करुनही रस्त्यांचे काम गुणवत्तापूर्ण होत नाही. लवकरच हे रस्ते खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. या कामाच्या दर्जाची चौकशी करावी. यात सहभागी असलेले अधिकारी, ठेकेदार यांची चौकशी करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली आहे.

कामाच्या गुणवत्तेची चौकशी करा – गडकरी
या तक्रारीची नितीन गडकरी यांनी तत्काळ दखल घेतली. तसेच त्यांनी रस्त्याच्या कामाची जबाबदारी असलेल्या ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांना दुरध्वनी केला. मावळ आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातून हा रस्ता जातो. त्यामुळे मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि भिवंडीचे खासदार कपील पाटील यांना बोलावून घ्यावे. त्यांच्यासोबत बैठक घ्यावी. कामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी अशा सूचना गडकरी यांनी अधिकाऱ्यांंना दिल्या असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.